लग्नात कमी हुंडा दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ , गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2019 04:15 PM2019-04-05T16:15:02+5:302019-04-05T16:18:38+5:30
फिर्यादीच्या आई-वडिलांनी लग्नात सोन्याच्या बांगड्या केल्या नाही म्हणून तसेच कमी हुंडा दिल्याने आरोपींनी विवाहितेचा छळ केला.
पिंपरी : लग्नात सोन्याच्या बांगड्या दिल्या नाही, तसेच कमी हुंडा दिल्याच्या कारणावरुन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रथमेश दत्तात्रय पाटील, दत्तात्रय पाटील, संगीता दत्तात्रय पाटील (सर्व रा. गायकवाडनगर, दिघी) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी २६ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश याचे फिर्यादी यांच्याशी ६ मे २०१८ ला लग्न झाले. लग्न ठरविताना प्रथमेश हा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनिअर पास असल्याचे सासरच्या मंडळींनी खोटे सांगितले. तसेच फिर्यादीच्या आई-वडिलांनी लग्नात सोन्याच्या बांगड्या केल्या नाही म्हणून तसेच कमी हुंडा दिल्याने आरोपींनी विवाहितेचा छळ केला. यासह माहेराहून आणखी ५० हजार रुपये व भावाची दुचाकी आणण्यास सांगितले. या कारणावरुन आरोपींनी विवाहितेला शिवीगाळ करत मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला ८ फेब्रुवारीला माहेरी हाकलून दिले. दरम्यान, विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.