दुचाकी व जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 04:12 PM2019-03-26T16:12:07+5:302019-03-26T16:15:54+5:30
माहेरहून तीन लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिंपरी : दुचाकी व जागा घेण्यासाठी माहेरहून तीन लाख रुपये आणावेत यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती किशोर भानुदास धोत्रे, गंगुबाई धोत्रे, भानुदास धोत्रे, विजय धोत्रे (सर्व रा. शाहागड, ता. आंबड, जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी २७ वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फियार्दी महिलेचे किशोर धोत्रे याच्याशी ५ मे २०१५ ला आळंदी येथे लग्न झाले. त्यानंतर विवाहिता सासरी गेली असता गंगुबाई धोत्रे हिने विवाहितेच्या अंगावरील दागिने काढून घेतले. काही दिवसांनी दागिने परत मागितले असता विवाहितेचा छळ केला. त्यानंतर किशोर याच्यासाठी दुचाकी व जागा घेण्यासाठी तीन लाख रुपयांची मागणी विवाहितेकडे करण्यात आली. मात्र, विवाहिता व तिच्या आई-वडिलांनी मागणी पूर्ण न केल्याने आरोपींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.