लखनऊच्या लवाना हॉटेलला भीषण आग; चौघांचा मृत्यू, अनेक गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2022 01:14 PM2022-09-05T13:14:40+5:302022-09-05T13:15:01+5:30
पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.
उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊच्या एका हॉटेलला भीषण आग लागली होती. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. शहराच्या मधोमध असलेल्या लेवाना हॉटेलमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
आग लागली तेव्हा हॉटेलमध्ये अनेक ग्राहक आलेले होते. त्यांना बाहेर काढण्यात येत आहे. अग्निशमन दल आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या घटनेचा तपास मुख्य सचिव गृह, मुख्य सचिव वैद्यकीय आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय समिती करणार आहे.
पोलिसांच्या मदतीने आतापर्यंत 15 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. हॉटेलच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर अनेक लोक अडकले आहेत. लखनौ विकास प्राधिकरणाने काही दिवसांपूर्वी लेवाना हॉटेलला नोटीस बजावली होती.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जखमींची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये विचारपूस केली. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. आगीचे कारण समोर आलेले नाही. हॉटेलमध्ये धुराचे लोट दिसत आहेत. खोल्यांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत आहेत. खिडक्याही तोडल्या जात आहेत. आगीमुळे हॉटेलच्या सर्व खोल्यांमध्ये धुराचे लोट पसरले होते. आतापर्यंत अनेकांना बाहेर काढले असून जे अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.