Bulli Bai App: बुली बाई ॲपचा मास्टरमाइंड म्हणे, मुंबई पोलिसांनी केलेली अटक चुकीची, मी एकटाच आरोपी...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:24 AM2022-01-07T07:24:12+5:302022-01-07T07:24:23+5:30
Bulli Bai App case: दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोईने @giyu44 या अकाउंटवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी दोघांचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : दिल्ली पोलिसांनी बुली बाई ॲपचा मास्टरमाइंड नीरज बिश्नोई याला अटक केल्यानंतर त्याने तयार केलेल्या ट्विटर हॅण्डलवरून मुंबई पोलिसांनी केलेली अटक चुकीची असल्याचे सांगितले आहे. याबाबत दिल्ली पोलीस त्याच्याकडे अधिक तपास करत आहेत.
बुली बाई ॲपचे ट्विटर हॅण्डल बनविणाऱ्या मुख्य आरोपी श्वेता सिंहसह मयंक रावत (२१) आणि विशाल कुमार झा (२२) या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याच प्रकरणातील अन्य आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. पोलिसांकड़ून अन्य आरोपींचा शोध सुरू असताना, दिल्ली पोलिसांनी ॲप बनविणाऱ्या बिश्नोई याला अटक केली.
दिल्ली पोलिसांनी केलेल्या चौकशीत बिश्नोईने @giyu44 या अकाउंटवरून मुंबई पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी दोघांचा सहभाग नसल्याचे सांगितले आहे. याबाबत त्याने अनेक ट्विट केले आहे. त्यानुसार, दिल्ली पोलीस अधिक तपास करत आहेत.
नीरज हा मूळचा जोरहाटचा राहणारा असून, तो भोपाळमध्ये शिकतो. त्यानेच बुली बाई हे ॲप गिटहब प्लॅटफॉर्मवर निर्माण केले. तसेच तो बुली बाईचा मुख्य ट्विटर अकाउंट होल्डरही आहे, असे पोलिसांनी सांगितले. नीरजला दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स ्युजन अँड स्ट्रॅटेजिक शाखेने अटक केली. त्याने हे ॲप तयार केल्याची कबुली दिली. त्याच्या लॅपटॉपमध्ये या ॲपचे काही पुरावे सापडले आहेत, असे उपपोलीस आयुक्त (आयएफएसओ) के. पी. एस. मल्होत्रा यांनी सांगितले.
या ॲप प्रकरणात कथित सहभागाच्या आरोपावरून आतापर्यंत नीरज बिश्नोईसह ४ जणांना अटक झालेली आहे. या ॲपवर शेकडो मुस्लीम महिलांची लिलावासाठी यादी बनवण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या इतर ३ जणांमध्ये उत्तराखंडमधील १८ वर्षांच्या श्वेता सिंह या तरुणीचा समावेश आहे. याप्रकरणी ही तरुणीही मुख्य आरोपी आहे.