इंदूरच्या आयपीएस अकादमीचा विद्यार्थी ‘सुल्ली डील’चा मास्टरमाइंड; पोलिसांनी लावला छडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 07:44 AM2022-01-10T07:44:20+5:302022-01-10T07:45:04+5:30

दिल्ली पोलिसांनी इंदूरमधून घेतले ताब्यात, मुस्लिम महिलांच्या बदनामीसाठी रचला कट

Mastermind of 'Sulli Deal', a student of IPS Academy, Indore | इंदूरच्या आयपीएस अकादमीचा विद्यार्थी ‘सुल्ली डील’चा मास्टरमाइंड; पोलिसांनी लावला छडा

इंदूरच्या आयपीएस अकादमीचा विद्यार्थी ‘सुल्ली डील’चा मास्टरमाइंड; पोलिसांनी लावला छडा

googlenewsNext

मुंबई : बुल्ली बाई ॲपच्या मास्टरमाइंडला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांनी पुन्हा धडक कारवाई करत सुल्ली डील ॲप तयार करणाऱ्या तरुणाला इंदूरमधून अटक केली आहे. औमकारेश्वर ठाकूर (२५) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव असून त्याने इंदूरच्या आयपीएस अकादमीमधून बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशनचे (बीसीए) शिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. केवळ मुस्लीम महिलांची बदनामी करण्यासाठी त्याने हे ॲप तयार केल्याची कबुली पोलिसांना दिली.

बुल्ली बाई ॲप बनवणाऱ्या नीरज बिश्नोई याला अटक करून दिल्ली पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या चौकशीत, तो सोशल मीडियावर विविध व्हर्च्युअल ओळखी असलेल्या व्यक्तीशी संवाद साधत, ग्रुपमध्ये चर्चा करत होता. यातच जुलै २०२१ मध्ये तो ज्या ग्रुपमध्ये सदस्य होता त्या ग्रुपवर एकाने सुल्ली डील ॲपचे तपशील शेअर केले. त्यावेळी गिटहब ॲपबाबत पहिल्यांदाच ऐकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे. त्यानंतर, सुल्ली डीलच्या गोंधळानंतर, हे ट्विटर हँडल आणि इतर मजकूर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून हटविले होते.

चौकशीत, इंदूर कनेक्शन उघडकीस आले. तांत्रिक पुराव्याच्या मदतीने केलेल्या तपासात औमकारेश्वर ठाकूरच्या एका ट्विटर हँडलची माहिती पोलिसांना मिळाली. दिल्ली पोलिसांच्या आयएफएसओच्या विशेष पथक इंदूरला रवाना झाले. शनिवारी सर पथकाने इंदूरच्या न्यूयॉर्क सिटी टाऊनशिपमधून ठाकूरला ताब्यात घेत अटक केली. त्याच्याकडील मोबाइल, लॅपटॉपमधूनही महत्त्वपूर्ण माहिती हाती लागली. त्याच्या चौकशीत त्यानेच सुल्ली डील ॲप तयार केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांकडून त्याच्या लॅपटॉप आणि सायबर स्पेसमधील आवश्यक डिजिटल फूटप्रिंट्सची चौकशी सुरू आहे. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची कोठडी सुनावली. या घटनेचा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ट्रेडमहासभा ग्रुपचा सदस्य

ठाकूरने इंदूरच्या आयपीएस अकादमीमधून बीसीए केले आहे. त्याच्या चौकशीदरम्यान समोर आले की, तो जानेवारी २०२० पासून ‘ट्रेडमहासभा’ ग्रुपचा सदस्य होता. त्याच ग्रुपवर त्याने, मुस्लीम महिलांना बदनाम आणि ट्रोल करण्याचे ठरवले. त्यानुसार, त्याने गिटहबवर कोड विकसित केला होता. त्याने हे ॲप त्याच्या ट्विटर अकाउंटवर शेअर केले.

डिलीट डाटा मिळवण्याचा प्रयत्न

ठाकूरने डिलीट केलेला डाटा पुन्हा मिळवण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच सुल्ली डील ॲपशी संबंधित कोड/इमेज पुनर्प्राप्त करण्यासाठी तांत्रिक गॅझेटचे पुढील विश्लेषण सुरू आहे.

Web Title: Mastermind of 'Sulli Deal', a student of IPS Academy, Indore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.