दुकानमालकाचे प्रसंगावधान; दुकानाला भगदाड पाडून सराफाच्या दुकानात दागिन्यांची लूट करणारा सूत्रधार जेरबंद
By जितेंद्र कालेकर | Published: January 10, 2023 09:55 PM2023-01-10T21:55:39+5:302023-01-10T21:56:48+5:30
या लुटीतील सर्वच म्हणजे चार लाख ३२ हजारांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.
ठाणे : कोपरीतील भवानी ज्वेलर्स या सोन्या चांदीच्या दुकानात लुटीसाठी शेजारचे दुकान भाड्याने घेऊन फर्निचरचे काम करण्याच्या नावाखाली दुकानात लुटीसाठी शिरलेल्या तिघांपैकी धर्मेद्र तिवारी (२९, रा. नवी मुंबई, मुळ रा. लखनौ, उत्तरपदेश) याला दुकान मालकाच्या प्रसंगावधानामुळे अटक करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक अविनाश सोंडकर यांनी मंगळवारी दिली. त्याचे इतर दोन साथीदार मात्र पसार झाले आहेत. या लुटीतील सर्वच म्हणजे चार लाख ३२ हजारांचे दागिनेही हस्तगत करण्यात आले आहेत.
कोपरीतील नारायण कोळी चौकात दिलीप कटारिया यांचे सोने चांदीच्या दागिन्याचे भवानी ज्वेलर्स हे दुकान आहे. याच दुकानाच्या बाजूला गाळा क्रमांक तीनमध्ये धर्मेद्र तिवारी याच्यासह तिघांनी फरसाण विक्रीचे दुकान एक लाख रुपये अनामत रक्कम आणि २५ हजार रुपये भाड्याने आठ दिवसांपूर्वी घेतले होते. त्यामुळे या गाळयामध्ये त्यांनी फर्निचरचे काम सुरु केले होते. सोमवारी या भागातील सराफाची दुकाने बंद असतात. हीच संधी साधून फर्निचरचे काम करता करता या त्रिकुटाने आधी बाजूलाच असलेल्या भवानी ज्वेलर्स या दुकानाला ९ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास भगदाड पाडले. त्यातून आत शिरुन गॅस कटरच्या सहाय्याने तिजोरी फोडण्याचा प्रयत्न करुन चार लाख २५ हजारांचे ८० ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार आणि सात हजार दोनशे रुपयांची रोकड असा चार लाख ३२ हजार दोनशे रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला. हे त्रिकुट दुकानात असतांनाच दुकानाचे मालक दिलीप कटारिया तिथे पोहचले. त्यांना गॅसचा वास आल्यामुळे गाळा उघडला. त्यावेळी हे चोरटे तिथेच होते. त्यांनी तातडीने कोपरी पोलिसांना माहिती देताच सहायक पोलिस निरीक्षक श्रीराम पाटील आणि हवालदार मच्छिंद्र पिसाळ यांनी तिथे धाव घेत मुख्य सूत्रधार धर्मेद्र तिवारी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरीतील मालही जप्त केला. या धुमश्चक्रीत त्याचे इतर दोन साथीदार मात्र पसार झाले. या दोघांचाही शोध घेण्यात येत असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले.