बोगस चिनी कंपन्यांच्या मास्टरमाइंडला अटक; भारताबाहेर पळून जाण्याचा प्रयत्न फसला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2022 09:40 AM2022-09-12T09:40:32+5:302022-09-12T09:40:40+5:30
दोर्तसे हा जिलियन इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळावर होता. आपण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील रहिवासी आहोत, असे त्याने कंपनीच्या कागदपत्रांमध्ये नमूद केले होते.
नवी दिल्ली : भारतामध्ये चिनी लागेबांधे असलेल्या बनावट कंपन्या सुरू करणाऱ्या व त्यांना तोतया संचालक पुरविण्याच्या गैरकृत्यांचा मास्टरमाइंड दोर्तसे याला सीरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसच्या तपास पथकाने शनिवारी अटक केली. दोर्तसे हा बिहारमधील गयामार्गे देशाबाहेर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक केली. कर्ज देणाऱ्या ॲपचा सुळसुळाट झाला आहे. यातून लोकांची पिळवणूक होत असल्याच्या, कर्जवसुलीसाठी त्यांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली.
जिलिअन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीची उपकंपनी असलेल्या जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रा. लि. या कंपनीच्या गुरगाव येथील तर फिनिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या बंगळुरूमधील व हसीस कन्सल्टिंग लिमिटेड या कंपनीच्या हैदराबाद येथील कार्यालयांवर केंद्रीय यंत्रणांच्या तपास पथकांनी नुकतेच छापे टाकले. त्यातून देशात बनावट चिनी कंपन्या सुरू करण्यामागे दोर्तसे हाच मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाले.
खोटी कागदपत्रे
दोर्तसे हा जिलियन इंडिया लिमिटेडच्या संचालक मंडळावर होता. आपण हिमाचल प्रदेशमधील मंडी येथील रहिवासी आहोत, असे त्याने कंपनीच्या कागदपत्रांमध्ये नमूद केले होते. ही सर्व माहिती खोटी असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मात्र दोर्तसे हा भारतात कसा आला, त्याने चीनशी संबंधित बनावट कंपन्या कोणाच्या संगनमताने सुरू केल्या, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही.
चिन्यांच्या संपर्कात
ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या बनावट कंपन्यांचे भारतातील कर्मचारी एका मेसेजिंग ॲपद्वारे आपल्या चिनी भागीदारांच्या संपर्कात होते. हसीस ही कंपनी व जिलिआन हाँगकाँग लिमिटेड या कंपनीशी संगनमत होते, असेही केंद्रीय यंत्रणांच्या तपासात आढळून आले आहे. बनावट चिनी कंपन्यांवर धाडी टाकण्यात आल्यानंतर दोर्तसे याने दिल्ली एनसीआर परिसरातून पलायन केले होते व तो देशाबाहेर जाण्याच्या प्रयत्नात होता.
३३ कंपन्यांच्या चौकशीचे आदेश
जिलियन कन्सल्टंट्स इंडिया प्रा. लि. व अन्य ३२ कंपन्यांची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय कॉर्पोरेट घडामोडीविषयक खात्याने
दिले आहेत. त्यामध्ये चीनशी लागेबांधे असलेल्या बहुतांश कंपन्या आहेत. भारतात बनावट चिनी कंपन्यांमार्फत जे संशयास्पद आर्थिक गैरव्यवहार चालतात, त्यांमध्ये या कंपन्यांचा हात असल्याचे काही पुरावे तपास यंत्रणांना मिळाले आहेत.