"मुलगा किडनॅप झालाय...", वडिलांना आला धमकीचा मेसेज; तपासात धक्कादायक सत्य उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 02:12 PM2024-02-23T14:12:59+5:302024-02-23T14:20:25+5:30
अर्जुन बेपत्ता झाल्यानंतर काही वेळाने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर त्याचं अपहरण झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे घरात एकच खळबळ उडाली.
उत्तर प्रदेशात एका तरुणाच्या अपहरणाच्या बातमीने खळबळ उडाली आहे. मुलाच्या वडिलांच्या मोबाईलवर अपहरणाचा मेसेज आला होता. वडिलांनी पोलिसांत तक्रार केल्यानंतर तपास सुरू झाला. काही तासांनंतर पोलिसांनी या मुलाला दिल्लीतून ताब्यात घेतलं. या अपहरण प्रकरणाचा खुलासा करताना पोलिसांनी अशी गोष्ट सांगितली जी ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे.
हे संपूर्ण प्रकरण मथुरा शहरातील कोतवालीच्या बलदेव नगर भागातील आहे. काल (22 फेब्रुवारी) राजेश चौधरी यांचा 17 वर्षांचा मुलगा अर्जुन अचानक बेपत्ता झाला होता. पोलिसांना माहिती मिळाली की, अर्जुन त्याच्या स्कूटरवर दूध आणण्यासाठी निघाला असताना दोन जणांनी त्याचं अपहरण केलं. अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला.
अर्जुन बेपत्ता झाल्यानंतर काही वेळाने त्याच्या वडिलांच्या मोबाईलवर त्याचं अपहरण झाल्याचा मेसेज आला. त्यामुळे घरात एकच खळबळ उडाली. याची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. अपहरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आणि ज्या क्रमांकावरून मेसेज आला होता तो नंबरवर लक्ष ठेवलं.
मोबाईल नंबरचं लोकेशन दिल्लीतील असल्याचं समोर आलं. पोलिसांनी अर्जुनला 10 तासांत शोधून काढलं. चौकशीत अर्जुनचे अपहरण झाले नसून तो स्वतः घरातून पळून गेल्याचं उघड झालं. कारण, अर्जुनला घरातील सदस्यांचा राग आला होता. आपली एक इच्छा पूर्ण करण्यासाठी तिने स्वतःच्या अपहरणाची गोष्ट रचली होती जेणेकरून वडील विनंती मान्य करतील.
अर्जुनचा मोबाईल ऑन असल्याने पोलिसांना त्याचे लोकेशन मिळाले असल्याचे सांगितले जात आहे. यावेळी तो पलवल आणि फरिदाबादमार्गे दिल्लीला गेल्याचे समजले. त्याचे लोकेशन दिल्लीतील करोलबागमध्ये आढळून आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले आणि सायंकाळी उशिरा मथुरा येथे आणून त्याच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.