मॅटर सॉल्व्ह कर दो, नहीं तो इधर ही बिठाके रखूंगा; आमदार सुर्वे यांच्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 06:32 AM2023-08-11T06:32:29+5:302023-08-11T06:32:54+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यासह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गोरेगावमध्ये एका व्यावसायिकाला मारहाण करत बंदुकीच्या धाकावर कार्यालयातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. याप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे याच्यासह १० ते १५ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
यासंदर्भात सविस्तर तपशील असा की, गोरेगाव पूर्व परिसरात राहणारे व्यावसायिक राजकुमार सिंग यांची ग्लोबल म्युझिक जंक्शन प्रा. लि. ही कंपनी आहे. त्यांची कंपनी कर्ज देण्याचेही काम करते. मनोज मिश्रा याने त्याचे ‘आदिशक्ती’ यूट्यूब चॅनेल राजकुमार सिंग यांच्याकडे गहाण ठेवून त्यांच्याकडून दोन वर्षांपूर्वी आठ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. करारानुसार मिश्राकडून सिंग यांना पाच वर्षांनंतर ११ कोटी रुपये मिळणार होते. मात्र, चॅनेलच्या नावाने घेतलेली कर्जची रक्कम मिश्रा याने अन्यत्र गुंतवल्याने सिंग यांच्या कंपनीचे नुकसान होण्यास सुरुवात झाली. त्यानंतर सप्टेंबर, २०२२ पासून मिश्राने करार रद्द करण्यासाठी सिंग यांच्यावर दबाव आणला.
बंदुकीच्या धाकावर सह्या
बंदुकीचा धाक दाखवत एका स्टॅम्प पेपरवर करार रद्द करत असल्याचे लिहून घेत सही करण्यास सिंग यांना भाग पाडले. त्यानंतर, शेजारच्या रूममध्ये असलेल्या महिलांकडे बोट दाखवून खोटा गुन्हा दाखल करण्याचीही भीती त्यांना घालण्यात आली. शिवाय, याबाबत कुठे वाच्यता केल्यास पद्माकर नावाच्या व्यक्तीने मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचेही सिंग यांनी तक्रारीत म्हटले आहे.
सिंग यांचे अपहरण अन् धमकी
n राजकुमार सिंग हे त्यांच्या कार्यालयात असताना बुधवारी दुपारी एका व्यक्तीने त्यांना दूरध्वनी करून ‘मैं प्रकाश सुर्वे के ऑफिस से बोल रहा हूँ. तुम अभी इधर आ जाने का’ म्हणत धमकावले. त्यांनी शनिवारी येतो सांगून कॉल कट केला. त्यानंतर, काही वेळातच १० ते १५ जणांनी कार्यालयात येत सिंग यांना मारहाण सुरू केली.
n सिंग यांचे अपहरण करत आमदार प्रकाश सुर्वे यांच्या दहिसर पूर्व येथील कार्यालयात त्यांना नेण्यात आले. त्यावेळी कार्यालयात राज सुर्वे आणि मनोज मिश्रा बसले होते. राज सुर्वे याने ‘मनोज मिश्रा का जो मॅटर है वो सॉल्व्ह कर दो, नही तो इधर ही बिठाके रखूँगा’, असे सांगितले.
n त्यानंतर, काही वेळात राज याला कुणाचा तरी कॉल आल्याने सिंग यांना अन्यत्र हलविण्यासाठी धडपड सुरू झाली. सिंग यांना पोलिसांचेही कॉल सुरू झाले. मात्र, त्यावेळी त्यांनी सगळे ठीक असल्याचे सांगितले.
n त्यानंतर, सिंग यांना जवळच्या एका इमारतीत नेण्यात आले. त्यांनी सुरुवातीला भीतीपोटी तक्रार दिली नाही. अखेर, रात्री उशिरा त्यांनी वनराई पोलिसांत तक्रार दाखल केली.
मनोज मिश्रा याच्यासह तिघांना विमानतळाबाहेरून ताब्यात घेण्यात आले आहे. अन्य दोघे त्याचे मित्र असून यामध्ये त्यांचा काय सहभाग आहे त्यानुसार, पुढील कारवाई करण्यात येईल.
- रामपियारे राजभर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वनराई पोलिस ठाणे