सवत घरी आणल्याने मुलांसोबत माऊलीने केली आत्महत्या? तीन मुलांना विष पाजून गळफासाचा संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2020 12:47 AM2020-12-12T00:47:21+5:302020-12-12T00:47:42+5:30
Bhiwandi News : जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
- मेघनाथ विशे
पडघा - भिवंडी तालुक्यातील उंबरखांड या जेमतेम साडेसहाशे लोकवस्तीच्या गावात वास्तव्य करीत असलेल्या श्रीपत बच्चू बांगारे याची पत्नी रंजनाचे ऑक्टोबर महिन्यात ऑपरेशन झाले होते. त्यावेळी घरातील लहान मुलांना सांभाळण्यासह घरकामाच्या जबाबदाऱ्या पार पाडण्याकरिता रंजनाच्या मावशीची मुलगी सविता ही आली होती. याच काळात श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. श्रीपतने सविताशी लग्न केले. यामुळे निराश झालेल्या रंजनाने पाच्छापूर येथील तानसा अभयारण्याला लागून असलेल्या घनदाट जंगलातील डोंगरमाथ्यावर जाऊन स्वत: व मुले दर्शना (१२), रोहिणी (६), रोहित (९) यांच्यासह आत्महत्या केली, असे प्राथमिक चौकशीत उघड झाले आहे. रंजनाच्या भावाने श्रीपत व सविता यांच्यावर रंजनाचा छळ केल्याबद्दल गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.
रंजना व तिची तीन मुले २० ऑक्टोबर २०२० रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. श्रीपतचा भाऊ संतोष हा जंगलात लाकडे तोडण्याकरिता गेला असता त्याला दुर्गंधी आल्याने तो त्या दिशेने गेला असता आप्प्याच्या झाडाला सडलेल्या अवस्थेतील दोन मृतदेह लटकले होते, तर दोन लहान मुलांचे मृतदेह जमिनीवर कोसळले होते. संतोषने ही वार्ता गावात देताच श्रीपत व सविता यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला.
पोलीस, घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ व रंजनाचे नातलग यांनी दिलेल्या माहितीनुसार, रंजनाचे ऑपरेशन झाल्याने घरातील कामे करण्याकरिता सविता आली होती. त्यावेळी श्रीपत व सविता यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांनी लग्न केले. या दोघांचे लग्न झाल्यानंतर जेमतेम तीन दिवसांनंतर रंजना ही मुलांसोबत निघून गेली. गेल्या दोन महिन्यांत तिचा ठावठिकाणा शोधण्यात पोलिसांना यश आले नाही. शुक्रवारी अचानक रंजना व तिच्या मुलांचे सडलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडले. जेथे हे मृतदेह सापडले तेथे विषारी औषधाची पुडी व बाटली आढळली. त्यामुळे रंजना हिने स्वत: व मुलांना विष पाजून नंतर त्यांचे मृतदेह झाडाला टांगून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
रंजना आणि तिची तीन मुले २० ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाली. याबाबत श्रीपतने पडघा पोलिसात तक्रार दिली होती. पोलिसांना घटनास्थळी विषाची पुडी सापडली आहे.
श्रीपत व सविता हे सध्या मुंबईतील जे.जे. इस्पितळात उपचार घेत असून त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांच्या चौकशीतून अधिक माहिती उघड होईल. ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.