अखेर 'माऊली'ची मृत्यूशी झुंज अपयशी, १३ दिवस होता व्हेंटिलेटरवर..; गावावर पसरली शोककळा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 20:40 IST2025-03-17T20:39:47+5:302025-03-17T20:40:29+5:30
गिरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत १ लाख ३० हजार रुपये जमा करून कुटुंबाला आर्थिक मदत केली होती.

अखेर 'माऊली'ची मृत्यूशी झुंज अपयशी, १३ दिवस होता व्हेंटिलेटरवर..; गावावर पसरली शोककळा
धाराशिव - भूम तालुक्यातील पाथ्रुड येथील बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या १८ वर्षीय तरुणास क्रूरतेचा कळस गाठत सात ते आठ तरूणांनी रॉड, काठी तसेच तीक्ष्ण हत्याराने मारहाण केली. या मारहाणीत मृत झाल्याचं समजून त्याला पांढरेवाडी येथील शिवारात रस्त्याच्या कडेला फेकून दिल्याची घटना ११ मार्च रोजी उजेडात आली. सोलापूर येथील खासगी रूग्णालयात त्याच्या उपचार सुरू होते. मात्र माऊलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. १६ मार्च रोजी त्याचा मृत्यू झाला अन् गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधोडी गावावर शोककळा पसरली.
पाथ्रुड येथील माऊली गिरी असं अमानुष मारहाण झालेल्या तरूणाचं नाव होते. ३ मार्च रोजी दुपारी माऊलीचा परंडा तालु्क्यातील सतीश जगताप आणि इतर ६-७ जणांनी लोखंडी रॉड, काठीने जबर मारहाण केल्याचा फोन केला असता तो सातत्याने बंद लागत होता. यामुळे बस प्रवासात फिर्यादी वडिलांनी त्यांचे भाऊ आणि मित्राला याबाबत माहिती दिली. सायंकाळी ५ च्या सुमारास पोलीस पाटलांनी माऊलीच्या वडिलांना फोन करून तुमच्या मुलाला जबर मारहाण करून नग्नावस्थेत पांढरेवाडी शिवारात रस्त्यालगत फेकून दिल्याचे सांगितले.
त्यानुसार माऊलीचा शोध घेऊन त्याला त्याच दिवशी जामखेड येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला सोलापूर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी नेले. अखेर १३ दिवसांनी माऊलीची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. माऊलीच्या निधनाची बातमी समजताच गिरी कुटुंबासह संपूर्ण दुधोडी गावावर शोककळा पसरली. गिरी कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती त्यामुळे ग्रामस्थांनी एकत्र येत १ लाख ३० हजार रुपये जमा करून कुटुंबाला आर्थिक मदत केली होती.
गिरी कुटुंब निराधार झाले
रॉड, काठ्या तसेच शस्त्राने केलेल्या बेदम मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या माऊलीचे तेराव्या दिवशी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. माऊली हा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या जाण्याने गिरी कुटुंबाचा आधार हिरावला गेला. माऊलीला अत्यंत क्रूरपणे मारहाण करून त्याचा जीव घेतला. संबंधित खुन्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी गिरी कुटुंबासह दुधोडी ग्रामस्थांनी केली आहे.
१३ दिवस व्हेटिंलेटरवरच होता...
माऊलीस क्रूरतेने मारहाण झाली होती. पाठ तसेच पायामध्ये प्रचंड रक्त साकाळले होते. प्रकृती गंभीर असल्याने त्याला जामखेड येथील रुग्णालयातून सोलापूर येथे हलवण्यात आले होते. पहिल्या दिवसापासूनच तो व्हेंटिलेटरवर होता असं नातेवाईकांनी सांगितले. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून दोषींना फाशी द्यावी अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.