पैशांसाठीच केली मयांकची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2022 10:00 AM2022-08-04T10:00:48+5:302022-08-04T10:01:03+5:30
व्यवसायासाठी होती गरज : आराेपींना ६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड : मीरा रोडच्या क्लस्टर १ मध्ये येथील मयांक ठाकूर (१३) या आठवीच्या विद्यार्थ्याचे अपहरण व हत्या करून ३५ लाखांची खंडणी मागणाऱ्या आरोपींनी व्यवसायासाठी पैशांची गरज असल्याने चार महिन्यांपूर्वीच कट आखल्याची कबुली दिली आहे. हत्येसाठी वापरलेला चाकू, दुचाकी, कपडे, सिमकार्ड आदी पोलिसांनी जप्त केले आहेत. दाेन्ही आराेपींना ६ ऑगस्टपर्यंत पाेलीस काेठडी सुनावली.
पोलीस उपायुक्त अमित काळे, वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अफझल मोहम्मद अन्सारी (२२) याला स्वतःचे सलून टाकण्यासाठी, तर मॅकेनिक असलेल्या इमरान नूरहसन शेख (२५) याला स्वतःचे गॅरेज टाकायचे होते. तसेच लग्न करायचे हाेते. यासाठी त्यांना पैशांची गरज होती. त्यामुळे आरोपींनी हे पैसे मिळवण्यासाठी एखाद्या मुलाचे अपहरण करण्याचा कट चार महिन्यांपूर्वी केला होता. त्यानुसार अफझल याने काही दिवसांपूर्वीच मयांकला हेरून त्याच्याशी जवळीक साधली. त्यानुसार ३१ जुलैला अफझल व इमरान यांनी मयांकला दुचाकीवरून फिरायला नेताे, सांगून नायगाव महामार्गावरील कामण खाडीपुलाजवळ नेले. तेथे त्याला आधी पुलावरून खाली फेकले, पण तो जिवंत असल्याचे पाहून चाकू भोसकून त्याची हत्या केली, असे उपायुक्त काळे यांनी सांगितले.
अपहरण व नंतर खंडणीचा कॉल आल्याने पथकाने अफझलला रॉयल पॅलेस इमारत परिसरातून तर इमरान याला नयानगरमधील त्याच्या मैत्रिणीच्या इमारतीच्या आवारातून १ ऑगस्टला अटक केली होती.
मयांककडून मिळवलेल्या सिमकार्डचा वापर
अफझलने आधीच मयांकला मोबाइल देतो सांगून घरातून सिमकार्ड आणायला सांगितले होते. त्याच सिमकार्डवरून १ ऑगस्टला दुपारी त्यांनी आधी आई हिनाला कॉल करून २५ लाखांची मागणी केली. नंतर रात्री पुन्हा कॉल केला असता ताे हिना यांनी उचलला नाही. त्यामुळे त्यांनी मयांकचा मामा विष्णू सिंग याला कॉल करून ३५ लाखांची खंडणी मागितली.