महापौरावरील गोळीबाराचा तपास पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 10:50 PM2020-01-06T22:50:49+5:302020-01-06T22:52:04+5:30
महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महापौरसंदीप जोशी यांच्यावर झालेल्या फायरिंग प्रकरणाचा तपास शहर पोलिसांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या खोलात जाऊन आम्ही सुक्ष्म अतिसुक्ष्म कंगोरे तपासत आहोत. या प्रकरणाशी संबंधित अनेक कड्या जुळविण्यात आम्हाला यश आले आहे. तीन ते चार दिवसांत प्रकरणाचा उलगडा करण्यात आम्ही यशस्वी ठरू, असा विश्वास पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी आज व्यक्त केला. संपलेल्या वर्षांत नागपूर पोलिसांनी काय कामगिरी केली, कोणते उपक्रम राबविले, त्यासंबंधीची माहिती देण्यासाठी त्यांनी पोलीस जिमखान्यात सोमवारी पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते.
हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू असताना ही घटना घडल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ निर्माण झाली होती. त्याचे पडसाद विधीमंडळाच्या सभागृहातही उमटले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालीन गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आयुक्त डॉ. उपाध्याय यांना आपल्या कक्षात बोलवून या घटनेची माहिती जाणून घेतली तसेच आरोपींचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पोलीस आयुक्तांशी चर्चा करून गोळीबार करणा-या आरोपीच्या मुसक्या बांधण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी १० पथके या प्रकरणाच्या तपासात गुंतवली होती. आरोपींचा छडा लावण्यासाठी आम्ही घटनास्थळ, आजुबाजुचा परिसर, महापौर जोशी यांचे निवासस्थान तसेच आजुबाजुच्या परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मोबाईल टॉवर नेटवर्कचा वापर करून आरोपींना शोधण्याचे प्रयत्न चालविले. दुसरीकडे त्यांना मिळालेल्या धमकी पत्राच्या पेट्यांकडेही लक्ष वेधून तपासाच्या कड्या जुळवल्या. आतापर्यंतच्या तपासात ५०० पेक्षा जास्त जणांची आम्ही चौकशी केली. त्यातील ६ जणांवर आमची नजर स्थिरावली आहे. त्यातील काही जण धमकी पत्र पेटीत टाकणारांपैकी असल्याचा संशय आहे. एक संशयीत बाहेर आहे. त्याला शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे. गोळीबाराचे आरोपी शोधून काढणे हे आमच्यासाठी आव्हान नव्हे तर प्रतिष्ठेचा विषय ठरला आहे. त्यासंबंधाने रात्रंदिवस प्रयत्न सुरू असून अनेक कड्या जुळल्या आहेत.
त्याच आधारे तीन ते चार दिवसांत प्रकरणाचा उलगडा करण्यात आम्हाला यश येईल, असा विश्वास असल्याचे डॉ. उपाध्याय म्हणाले.
आहिस्ते कदम चलावे लागेल
हा गोळीबाराच्या संबंधाने पत्रकारांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्याला उत्तरे देताना गोळीबार झाला अन् आरोपींनी कारवर तीन गोळ्या झाडल्याचेही त्यांनी म्हटले. मात्र, काही प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी तुमच्या एवढीच पोलिसांनाही उत्सुकता आहे. त्यामुळे तपास प्रगतीपथावर आहे. त्यामुळे आहिस्ते कदम चलावे लागेल, असेही आयुक्त म्हणाले. प्रकरण थेट महापौरांशी संबंधित आहे. त्याचा शक्य तेवढ्या लवकर छडा लावण्यासाठी कसोशिचे प्रयत्न सुरू आहे. यात कसलीही गडबड करणे योग्य होणार नसल्याचेही ते म्हणाले.