"बाबा, जमीन विकू नका, छोट्या भावाने डॉक्टर व्हावं"; MBBS च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:06 IST2024-12-26T15:06:05+5:302024-12-26T15:06:38+5:30
आपल्या छोट्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांना आपली जमीन विकू नये अशी विनंती केली होती.

"बाबा, जमीन विकू नका, छोट्या भावाने डॉक्टर व्हावं"; MBBS च्या विद्यार्थ्याचं टोकाचं पाऊल
एम्स भुवनेश्वर येथील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. रत्नेश कुमार मिश्रा याचा मृतदेह बुधवारी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे मिश्राने आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या छोट्या भावाला एक ऑडिओ मेसेज पाठवला होता, ज्यामध्ये त्याने आपल्या वडिलांना आपली जमीन विकू नये अशी विनंती केली होती. तसेच त्याने आपल्या भावाला डॉक्टर बनून आसाममध्ये राहण्यास सांगितलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रत्नेशच्या खोलीत सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये त्याने आपल्या मृत्यूला कोणीही जबाबदार नसल्याचं लिहिलं आहे.
१० दिवसांच्या सुट्टीनंतर मंगळवारी तो कॅम्पसमध्ये परतला. यावेळी त्याचे वडील त्याच्यासोबत भुवनेश्वरला आले होते. वडिलांनी पत्रकारांना सांगितलं की, सकाळी त्यांचं मुलाशी बोलणं झालं होतं, पण नंतर संपर्क होऊ शकला नाही. वारंवार फोन करूनही उत्तर न मिळाल्याने ते वसतिगृहात पोहोचले. दरवाजा आतून बंद असल्याचं दिसलं.
पोलिसांनी सांगितलं की, रत्नेशला तातडीने हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. एम्स-भुवनेश्वरचे संचालक आशुतोष बिस्वास नंतर वसतिगृहाच्या खोलीत पोहोचले जेथे रत्नेशने आत्महत्या केली होती. या प्रकरणी खंडगिरी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास सुरू करण्यात आला आहे.