धक्कादायक! मेडिकलच्या २७ विद्यार्थ्यांना मुंडण करून, हात बांधून फिरवलं; रॅगिंगच्या घटनेनं खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2022 03:48 PM2022-03-06T15:48:48+5:302022-03-06T15:50:58+5:30
विद्यार्थ्यांच्या रॅगिंगचा व्हिडीओ समोर आल्यानं खळबळ
देहरादून: हल्द्वानीमधील मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना मुंडण करून फिरवण्यात आल्याची घटना घडली आहे. विद्यार्थ्यांचं मुंडण करून त्यांना कॉलेज कॅम्पसमध्ये फिरवण्यात आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यांच्यामागे एक सुरक्षारक्षकदेखील चालताना दिसत आहे. या प्रकरणी कोणीही तक्रार दाखल केली नसल्याचं कॉलेज व्यवस्थापनानं सांगितलं.
मेडिकल कॉलेजच्या परिसरात शुक्रवारी २७ विद्यार्थी मुंडण केलेल्या अवस्थेत दिसले. ते एका रांगेत चालत होते. याशिवाय दुसऱ्या एका जागी जवळपास ७ विद्यार्थीदेखील याचप्रकारे रांगेत चालताना दिसून आले. सर्व विद्यार्थी मान खाली घालून चालत होते.
काही विद्यार्थ्यांनी एप्रन घातला होता. त्यांच्या पाठीवर बॅग होती. सर्व विद्यार्थी एमबीबीएसच्या पहिल्या वर्षात शिकत असल्याची माहिती मिळत आहे. सीनियर विद्यार्थ्यांच्या आदेशावरून पहिल्या वर्षात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी मुंडण केल्याची चर्चा आहे.
कॉलेज प्रशासनानं मात्र रॅगिंगसंदर्भात कोणतीही तक्रार प्राप्त झाली नसल्याचं सांगितलं. केस बारीक कापून येणं म्हणजे रॅगिंग होत नाही. ते रॅगिंगच्या व्याख्येत बसत नाही, असं स्पष्टीकरण कॉलेज व्यवस्थापनानं दिलं. तरीही या प्रकरणाची चौकशी करण्यात येईल आणि दोषींवर कारवाई
केली जाईल, असं आश्वासन व्यवस्थापनाकडून देण्यात आलं आहे.