नागपुरात एमडी तस्करीचे रॅकेट उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2020 12:29 AM2020-02-06T00:29:59+5:302020-02-06T00:32:23+5:30
गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात जमाल खान आणि मुंबईवरून एमडीचा पुरवठा करणाऱ्या नजीम शेख आणि त्याचा कुरियर मॅन शाहबाज खान याला अटक केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने एमडी तस्करी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. सहा महिन्यांपासून फरार असलेला कुख्यात जमाल खान आणि मुंबईवरून एमडीचा पुरवठा करणाऱ्या नजीम शेख आणि त्याचा कुरियर मॅन शाहबाज खान याला अटक केली. या कारवाईमुळे शहरातील एमडीचा कारभार प्रभावित होण्याची शक्यता बळावली आहे.
जमाल हा गेल्या सहा महिन्यांपासून फरार होता. सहा महिन्यांपूर्वी नंदनवन पोलिसांनी त्याला एमडीसह पकडले होते. त्याच्याजवळून एक लाख रुपयाची एमडी आणि अडीच लाख रुपये जप्त करण्यात आले होते. तो पोलिसांना गुंगारा देऊन पळाला होता. नंदनवन पोलिसांच्या पथकाने एमडी व त्याच्याजवळची रक्कम जप्त करण्याऐवजी आपल्याजवळ ठेवली होती. जमालने एमडी जावेदकडून घेतली होती. हा प्रकार समोर येताच नंदनवन पोलीस ठाण्यातील पाच कर्मचाऱ्यांना अटक करून, त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी पोलीस कर्मचारी अजूनही तुरुंगात आहेत, तर जावेद जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा एमडीची तस्करी करीत होता. नुकतेच त्याला नंदनवन पोलिसांनी पुन्हा एमडी तस्करी करताना पकडले. यानंतर जमाल पकडला जात नसल्याने प्रश्न निर्माण झाले होते. लोकमतने तो बुटीबोरीत लपून बसल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. यानंतर एनडीपीएस सेल कामाला लागले. जमालला याची माहिती होताच तो उमरखेड (यवतमाळ) येथील आपल्या सासरी पळून गेला. एनडीपीएस सेलला याची माहिती होताच त्यांनी सापळा रचून त्याला पकडले.
त्याचप्रकारे दुसऱ्या एका प्रकरणात एनडीपीएस सेलने ११ डिसेंबर २०१९ रोजी ठाणे येथील गुन्हेगार संदेश मून याला एक लाख रुपयाच्या एमडीसह पकडले होते. तो मुंबईवरून एमडी घेऊन आला होता. संदेशने मुंबईच्या नजीम शेख गुलमोहम्मद शेख (२९) याच्याकडून एमडी खरेदी केल्याचे सांगितले होते. एमडीची डिलिव्हरी देण्यासाठी शहबाज रमजान खान नागपूरला आला होता. तेव्हापासून एनडीपीएस सेल नजीम आणि शहबाजच्या शोधात होते. पोलिसांनी मुंबईत सापळा रचून दोघांना अटक केली. नजीम एमडी तस्करीतील मोठा मासा आहे. तो अनेक वर्षांपासून एमडी तस्करी करतो. नागपुरात त्याचे अनेक ग्राहक आहेत.
ही कारवाई डीसीपी गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनात निरीक्षक सार्थक नेहेते, एपीआय विजय कसोधन, एएसआय बयाजीराव कुरले, राजकुमार देशमुख, विठोबा काळे, हवालदार प्रदीप पवार, प्रशांत देशमुख, सतीश मेश्राम, नृसिंह दमाहे, शिपाई राकेश यादव, सतीश निमजे, नामदेव टेकाम, नितीन रांगने, नितीन मिश्रा, राहुल गुमगावकर, नितीन साळुंके, नरेश शिंगणे यांनी केली.
शहबाज केवळ डिलिव्हरी बॉय
शहबाज केवळ डिलिव्हरीचे काम करतो. तो एका महिन्यात तीन ते चार वेळा नागपूरला येतो. प्रत्येक डिलिव्हरीसाठी त्याला येण्या-जाण्यासाठी कंफर्म रेल्वे तिकीट आणि ५ हजार रुपये दिले जातात. अशा पद्धतीने तो नागपूर ते मुंबई ये-जा करून १५ ते २० हजार रुपये कमावतो. शहबाजप्रमाणेच मुंबईवरून अनेक युवक एमडीची डिलिव्हरी देण्यासाठी येतात. त्यामुळे शहरात एमडी तस्करीचे मोठे रॅकेट असल्याचे दिसून येते.