अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरीतून १२ लाखांचे एमडी जप्त, चार जणांना अटक
By मनीषा म्हात्रे | Published: December 4, 2023 05:58 PM2023-12-04T17:58:28+5:302023-12-04T17:58:44+5:30
एएनसीने यावर्षी ९८ गुन्हे दाखल करत त्यामध्ये एकूण २०६ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे.
मुंबई : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी विभागाने (एएनसी) विशेष मोहिमेदरम्यान अंधेरी, डोंगरी व जोगेश्वरी या परिसरात सर्च ऑपरेशन करत चौकडीला बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून १२ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.
एएनसीचे पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे, कांदिवली कक्षाने ही कारवाई केली आहे. यामध्ये अंधेरी, डोंगरीत कारवाई दरम्यान दोघे जण मिळून एमडीसह मिळून आले. त्याच परिसरातील तिसऱ्या व्यक्तीकडून त्यांनी ते घेतल्याचे समजताच त्यालाही ताब्यात घेण्यात आले. एकूण ६ लाख किंमतीचे एमडी जप्त करत तिघांना अटक केली. दुसऱ्या कारवाईत जोगेश्वरीतून सहा लाखांचा एमडी जप्त करत एकाला अटक केली. एकूण जणांना अटक करत १२ लाखांचा एमडी जप्त करण्यात आला आहे.
एएनसीने यावर्षी ९८ गुन्हे दाखल करत त्यामध्ये एकूण २०६ अंमली पदार्थ तस्करांना अटक केली आहे. त्यांचे ताब्यातून एकूण ४८ कोटीपेक्षा अधिक किंमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात यश आलं आहे. एम.डी. (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यां विरुध्द ६५गुन्हे दाखल करत एकूण १३८ आरोपीविरुध्द कारवाई केली असून, त्यांचे ताब्यातून अंदाजे ३० कोटी रूपये पेक्षा अधिक किंमतीचा ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.