उल्हासनगर महापालिकेत दोन कर्मचाऱ्यांची बनावट प्रमाणपत्र सादर करून वैद्यकीय सेवानिवृत्ती, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2022 05:42 PM2022-03-26T17:42:41+5:302022-03-26T17:43:52+5:30
याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून इतर सुविधा व सेवानिवृत्त वेतन बंद करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत.
सदानंद नाईक -
उल्हासनगर- सर जे जे स्थायी वैद्यकीय मंडळ व ज जी समूह रुग्णालय यांचे बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेला सादर करून वैद्यकीय सेवा निवृत्ती घेतल्याचा प्रकार उघड झाला. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून इतर सुविधा व सेवानिवृत्त वेतन बंद करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत.
उल्हासनगर महापालिकेत जन्मतारखेत फेरफार करून १९ वर्षापूर्वी जनसंपर्क अधिकारी पदाची नोकरी मिळविल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर, युवराज भदाणे याच्या विरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्याने भदाणे गेल्या एक महिन्यापासून फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
या प्रकरणा पाठोपाठ, दोन सफाई कर्मचाऱ्यांनी बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र महापालिकेला सादर करून वैद्यकीय सेवानिवृत्ती घेतल्याचा प्रकार उघड झाल्याने, एकच खळबळ उडाली आहे. रजनी दिनेश वाल्मिकी या २६ सप्टेंबर २०१२ रोजी सफाई कामगार म्हणून कामाला लागल्या होत्या. त्यांनी २६ एप्रिल २०१८ रोजी वैद्यकीय सेवानिवृत्तीचा अर्ज महापालिकेला सादर केला. १२ नोव्हेंबर २०२० रोजी त्यांचा वैद्यकीय अहवाल महापालिकेला मिळाला. त्यानुसार त्यांना २६ नोव्हेंबर २०२० रोजी वैद्यकीय सेवानिवृत्ती देण्यात आली.
तर दुसऱ्या घटनेत ५ ऑगस्ट २००८ मध्ये संगीता रमेश आगळे ह्या सफाई कामगार म्हणून महापालिकेत कामाला लागल्या. २२ मे २०१८ रोजी आगळे यांनी वैद्यकीय सेवानिवृत्तीसाठी अर्ज केला. शारिरीक दृष्ट्या पात्र आहेत की नाही. यासाठी जे जे रुग्णलाय येथे तपासणी करून घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. ५ ऑगस्ट २०२० रोजी तपासणी अहवाल महापालिकेला मिळल्यावर १८ डिसेंबर २०२० रोजी त्यांनाही वैद्यकीय सेवानिवृत्ती देण्यात आली. दरम्यान महापालिकेने वैद्यकीय प्रमाणपत्र जे जे स्थायी वैद्यकीय मंडळाकडे फेरतपासणीसाठी पाठविल्यावर, दोन्ही प्रमाणपत्र बनावट असल्याचे उघड झाले. अखेर पालिकेचे सहायक आयुक्त अच्युत सासे यांच्या तक्रारीवरून संगीता आवळे व रजनी वाल्मिकी यांनी महापालिकेची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबतची अधिक चौकशी करण्याचे संकेत उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी दिल्याने, एकच खळबळ उडाली आहे.