औषधी निर्माण अधिकाऱ्याने घेतली दोन हजारांची लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 09:44 PM2018-07-31T21:44:58+5:302018-07-31T21:45:44+5:30
प्रसुती रजेचे बिल मंजुरी प्रकरण; एसीबीची कारवाई
सिरोंचा (गडचिरोली) - तालुक्यातील नर्सिंहपल्ली येथील आरोग्य उपकेंद्रात कार्यरत महिला कर्मचाऱ्याकडून प्रसुती रजेचे बिल मंजूर करण्यासाठी २ हजार रुपयांची लाच घेणाऱ्या औषध निर्माण अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले. गडचिरोलीतीललाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) मंगळवारी दुपारी ही कारवाई केली.
श्रीनिवास व्यंकटय्या गटला (वय - ४६) असे त्या लाचखोर कर्मचाºयाचे नाव आहे. तो मोयाबीनपेठा प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहे. मात्र सध्या त्याच्याकडे सिरोंचा येथील तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील लिपिक पदाचा प्रभार आहे. नर्सिंहपल्ली आरोग्य उपकेंद्रात कार्यरत महिला कर्मचा ऱ्याचे प्रसुती रजेचे बिल मंजूर करून ते काढण्यासाठी त्याने २ हजार रुपयांची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर मंगळवारी २ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तो एसीबी पथकाच्या जाळ्यात अडकला.
दुपारी ३ वाजताच्या सुमारास तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच ही कारवाई करण्यात आली. त्याच्याविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.