२ तास ३५ मिनिटं घाबरवलं; डिजिटल अरेस्ट करून वृद्धाला २८ लाखांचा गंडा, एक कॉल अन्...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2024 04:32 PM2024-10-16T16:32:47+5:302024-10-16T16:34:06+5:30
एका वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्यांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे.
देशात सायबर गुन्ह्यांची प्रकरणं झपाट्याने वाढू लागल्याने डिजिटल अरेस्टसारखे धक्कादायक प्रकारही समोर आले आहेत. यामध्ये एखाद्या व्यक्तीला मेंटली कंट्रोल केलं जातं, एका फोन कॉलने त्यांना जाळ्यात ओढून लाखो रुपयांचा गंडा घातला जातो. उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये अशीच भयंकर घटना समोर आली आहे. डिजिटल अरेस्टद्वारे २८ लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली.
एका वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून त्यांची २८ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. वृद्ध व्यक्तीला एक फोन आला आणि त्यांचं आधार कार्ड वापरून एक नंबर सुरू करण्यात आला असून त्याचा वापर हा चुकीच्या कामासाठी करण्यात येत असल्याचं सांगितलं. अशा पद्धतीने घाबरवून त्या व्यक्तीची मोठी फसवणूक करण्यात आली. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मेरठच्या कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरात राहणारे सुरेश पाल यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांना ९ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने स्वत:ची ओळख ज्युनिअर टेलिकॉम अधिकारी महेंद्र अशी सांगितली. सुरेश पाल यांच्या आधार कार्डवरून एक नंबर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे लोकांना त्यावरून मेसेज पाठवून त्रास दिला जात असल्याचं कॉल करणाऱ्या व्यक्तीने त्यांना सांगितलं.
फसवणूक करणाऱ्या व्यक्तीने सुरेश यांना सांगितलं की, दिल्लीत त्यांच्या नावावर एफआयआर नोंदवण्यात आला असून दिल्ली पोलीस मुख्यालयातून फोन केला जाईल. या कॉलनंतर सुरेश पाल यांना एक व्हिडीओ कॉल आला ज्यामध्ये समोरच्या व्यक्तीने स्वतःची ओळख दिल्ली पोलीस मुख्यालयातील आयपीएस सुनील कुमार गौतम अशी करून दिली.
सुमारे २ तास 3५ मिनिटं या वृद्धाला धमकावलं आणि मनी लाँड्रिंगची केस असल्याचं सांगितलं. व्हिडीओ कॉल करणाऱ्या व्यक्तीने हेच सांगून सुरेश पाल यांना २८ लाख रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगितलं. जर तुम्ही निर्दोष असाल तर तुमचे सर्व पैसे हे तुम्हाला परत केले जातील असंही सांगितलं. सुरेश पाल यांनी दिलेल्या अकाऊंट नंबरवर पैसे ट्रान्सफर केले, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. याप्रकरणी सुरेश पाल यांनी मेरठच्या सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.