मेहुल चोक्सीने बँकांना घातला ५५ कोटींचा गंडा, नवा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 06:25 AM2022-07-15T06:25:59+5:302022-07-15T06:26:35+5:30
मुंबईत सीबीआयचे तीन ठिकाणी छापे
मुंबई : कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोन बँकांची एकूण ५५ कोटी २७ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याच्यावर गुरुवारी सीबीआयने एक नवा गुन्हा दाखल केला. चोक्सीने या बँकांच्या केलेल्या फसवणुकीप्रकरणी सीबीआयने गुरुवारी मुंबईत तीन ठिकाणी छापेमारी केली. चोक्सी याच्याबरोबरच चेतना झवेरी, दिनेश भाटिया, मिलिंद लिमये आणि काही अज्ञात सरकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गीतांजली जेम्स समूहातील बेझल ज्वेलरी ही कंपनी २००३ मध्ये मेहुल चोक्सी याने स्थापन केली होती. सोने आणि हिरे व्यापारासाठी ही कंपनी स्थापन करण्यात आली होती. या कंपनीला खेळत्या भांडवलासाठी कॅनरा बँकेने ३० कोटी रुपये तर बँक ऑफ महाराष्ट्रने २५ कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. मात्र, कर्जापोटी प्राप्त रकमेचा वापर हा व्यवसायासाठी न करता या पैशांद्वारे चोक्सी याने समूहातील एका कंपनीकडून घेतलेले कर्ज चुकविले.
तर उर्वरित पैशांची अन्यत्र फिरवाफिरवी केली. तसेच, या कर्जाची परतफेडही केली नाही, अशा आशयाची तक्रार कॅनरा बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक पी. संतोष यांनी सीबीआयकडे ३० ऑगस्ट २०२१ रोजी एका पत्राद्वारे केली होती. याची दखल घेत गुरुवारी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी चोक्सीच्या निवासस्थानी आणि संबंधित कार्यालयांवर छापेमारी करत काही कागदपत्रे ताब्यात घेतली आणि त्यानंतर हा गुन्हा नोंदविला.
या प्रकरणी २०१८ मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल करण्याच्या एकच दिवस अगोदर मेहुल चोक्सी ७ जानेवारी २०१८ मध्ये फरार झाला आणि त्याने ॲंटिग्वाचे नागरिकत्व स्वीकारले आहे. सध्या त्याला भारतात आणण्याच्या हालचाली सुरू असून यासंदर्भात प्रत्यार्पण याचिकांवर सुनावणी सुरू आहे.
कॅनरा बँक आणि बँक ऑफ महाराष्ट्र या दोन्ही बँकांनी या कर्ज प्रकरणाचे खाते अनुक्रमे २६ फेब्रुवारी २०१८ आणि ३० डिसेंबर २०१७ रोजी थकित खाते म्हणून घोषित केले. नीरव मोदी या आपल्या भाच्यासोबत कारस्थान करत मेहुलने यापूर्वी पंजाब नॅशनल बँकेच्या काही अधिकाऱ्यांशी संगनमत करत बँकेला १३,५७८ कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या सहा आणि चोक्सी याच्या कंपनीतील सहा कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र मोदी आणि चोक्सी दोघेही परदेशात पळून गेले आहेत.