मेहुल चोक्सी ‘आर्थिक फरार गुन्हेगार’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:10 AM2019-06-04T04:10:38+5:302019-06-04T04:10:56+5:30
पीएनबी घोटाळा; अंमलबजावणी संचालनालयाचा उच्च न्यायालयात दावा
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील आरोपी मेहुल चोक्सी हा ‘आर्थिक फरार गुन्हेगार’च आहे, असा दावा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उच्च न्यायालयात केला. चोक्सीने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या आहेत. ईडीने चोक्सीला ‘आर्थिक फरार गुन्हेगार’ जाहीर करावे, यासाठी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाविरोधात एक याचिका आहे. तर दुसरी ईडीने ज्या साक्षीदारांच्या आधारावर चोक्सीला आर्थिक फरार गुन्हेगार जाहीर केले, त्या साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी आहे. या दोन्ही याचिका फेटाळाव्यात अशी अशी विनंती ईडीने उच्च न्यायालयाला केली.
‘तो (मेहुल चोक्सी) आर्थिक फरार गुन्हेगार आहे. जाणूनबुजून तपास यंत्रणेपुढे येण्यास टाळत आहे. त्याने ६,०९०७ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. चौकशीसाठी त्याला तपासयंत्रणेने समन्स बजावूनही तो गैरहजर राहिला. तपासकामात ईडीला सहकार्य करणार नाही, असे त्याने सांगितले. विशेष न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले. तरीही तो न्यायालयात हजर राहिला नाही. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अॅक्ट अंतर्गत फौजदारी कारवाई टाळण्यासाठी तो देश सोडून फरार झाला. त्याने एंटीगुवा देशाचे नागरिकत्व स्वीकारले. याचाच अर्थ तो भारतात परत येण्यास इच्छुक नाही,’ असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
पुढील सुनावणी आज : चोक्सीला आर्थिक फरार गुन्हेगार म्हणून घोषित केले तरी न्यायालयात हजर राहून चोक्सी त्याच्यावरील हा टॅग हटवू शकतो. मात्र, तो गैरहजर राहिला तर न्यायालय त्याच्या संपत्तीवर टाच आणण्याचा आदेश देऊ शकते. देशातून फरार झालेल्या आरोपीची कायदेशीररीत्या कोंडी करून त्याला देशात परत येण्यास भाग पाडणे, हाच या कायद्याचा हेतू आहे, असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. उच्च न्यायालयाने चोक्सीच्या दोन्ही यचिकांवरील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.