मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2021 02:02 AM2021-01-24T02:02:08+5:302021-01-24T02:02:43+5:30

विवा समूह, पीएमसी बँक घोटाळा प्रकरण - विवा समूहाशी संबंधित छापे टाकलेल्या विविध सात ठिकाणी जप्तीची कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती

Mehul Thakur, Madan Gopal Chaturvedi arrested by ED; Confiscation action in seven places | मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई

मेहुल ठाकूर, मदन गोपाळ चतुर्वेदीला ईडीकडून अटक; सात ठिकाणी जप्तीची कारवाई

Next

मुंबई / नालासोपारा : विवा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर व मदन गोपाळ चतुर्वेदी यांना शनिवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली. २७ जानेवारीपर्यंत त्यांना ईडीची कोठडी सुनावण्यात आली आहे. या समूहाचे पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी जवळपास नऊ तास कसून चौकशी केल्यावर ही कारवाई करण्यात आली. बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

विवा समूहाशी संबंधित छापे टाकलेल्या विविध सात ठिकाणी जप्तीची कारवाई रात्रीपर्यंत सुरू होती. आतापर्यंत तेथून ७३ लाखांच्या रोकडीसह आर्थिक व्यवहारासंबधी कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल आदी डिजिटल साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात आले. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी मनी लाँड्रिंगबाबत गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांचा व्हिवा कंपनीशी संबंध असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर ते ईडीच्या रडारवर होते. त्याबाबत सर्व तयारी झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र पथकांनी शुक्रवारी सकाळपासून छापे सत्रे सुरू केले. त्यामध्ये विरारमधील विवाच्या मुख्य कार्यालय, अंधेरी, जुहू व चेंबूर येथील कार्यालय, तसेच कंपनीशी संबंधित आर्थिक सल्लागाराच्या निवासस्थानी समावेश होता. 

या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कंपनीचे आर्थिक व्यवहार, गुंतवणूक, देवाण-घेवाणसंबंधी दस्तऐवज मोठ्या प्रमाणात जप्त केला आहे. त्यामध्ये कॉम्प्युटर, लॅपटॉप आदी डिजिटल वस्तूचा समावेश आहे.  कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मेहुल ठाकूर, कंपनीचे आर्थिक
व्यवहार हाताळणारे संचालक मदन चतुर्वेदी यांना ताब्यात घेऊन ईडीच्या बेलार्ड पियार्ड येथील कार्यालयात आणण्यात आले. त्याच्याकडे जवळपास नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यांच्याकडून समाधानकारक खुलासा होऊ न शकल्याने शनिवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली. कंपनीच्या कार्यालयात जप्तीची कारवाई सुरू होती. पीएमसी बँकेच्या अनियमित कर्जातून शेकडो कोटींच्या घोटाळ्याबाबत राकेश वाधवान व कुटुंबीयांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले. त्यानंतर या प्रकरणाशी सबधितांवर कारवाई करण्यात येत आहे.
 

Web Title: Mehul Thakur, Madan Gopal Chaturvedi arrested by ED; Confiscation action in seven places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.