गतिमंद पीडित तरुणीनं पँट उलटी घातली अन् बलात्काराला वाचा फुटली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 09:50 AM2021-10-22T09:50:04+5:302021-10-22T12:09:41+5:30
गतिमंदपणातून आठ दिवसांत बरे करतो, असा बहाणा करून २२ वर्षीय तरुणीवर मांत्रिकाने अत्याचार केल्याची घटना शिरूर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी घडली होती.
बीड : गतिमंदपणातून आठ दिवसांत बरे करतो, असा बहाणा करून २२ वर्षीय तरुणीवर मांत्रिकाने अत्याचार केल्याची घटना शिरूर तालुक्यात पाच वर्षांपूर्वी घडली होती. याप्रकरणी गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्या. के. आर. पाटील यांनी आरोपीला दोषी ठरवून आठ वर्षांची सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. दिलीप वामन रोकडे (५७) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे.
२३ मार्च २०१६ रोजी दिलीप रोकडे याने पीडितेच्या आईची वस्तीवर जाऊन भेट घेतली. तुमच्या मतिमंद मुलीला आठ दिवसांत नीट करतो, असे सांगून त्याने विश्वास संपादन केला. त्याच्यावर विश्वास ठेवून दुसऱ्या दिवशी २४ मार्च २०१६ रोजी पीडितेला घेऊन आई त्याच्याकडे गेली. त्यावेळी त्याने अंगावरून लिंबू कापून टाकण्याच्या बहाण्याने पीडितेला ओढ्यात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून शिरूर ठाण्यात दिलीप रोकडेविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला जेरबंद करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
उलटी पॅन्ट घातल्याने गुन्ह्याला वाचा
पीडितेला घेऊन आरोपी ओढ्याच्या बाहेर आला. त्यानंतर मायलेकी घरी आल्या. मात्र, मुलीच्या अंगातील पॅन्ट उलटी घातलेली आईला आढळली.
तिने याबाबत मुलीकडे चौकशी केली, तेव्हा तिने तिच्यासोबत घडलेला घृणास्पद प्रकार सांगितला.