ठाण्यात साडे चार लाखांची मेफेड्रॉन पावडर जप्त, तीनजणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2021 06:03 PM2021-01-19T18:03:16+5:302021-01-19T18:04:01+5:30
Crime News : ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने अटक केली असून त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये किंमतीची मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली आहे.
ठाणे : ठाणे येथील राबोडी भागात मेफेड्रॉन पावडर विक्रीसाठी आलेल्या तीन जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एकने अटक केली असून त्यांच्याकडून साडे चार लाख रुपये किंमतीची मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली आहे.
बनोबर शफीक खोटाळ (३१), आदिल नजीरभाई शेख (२४), आणि असामा मोहम्मद हुसेन भाभा (१९) अशी अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यापैकी खोटाळ हा मुंबईचा तर, आदिल आणि असामा हे दोघे गुजरातचे रहिवाशी आहेत. हे तिघेजण राबोडी परिसरातील सव्र्हिस रोडवर मेफेड्रॉन पावडर विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनीट एक चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून एकूण ९० ग्रॅम वजनाची मेफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली असून तिची किंमत ४ लाख ५० हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी राबोडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सह आयुक्त सुरेश कुमार मेकला, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे ) संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) लक्ष्मीकांत पाटील, सहा.पोलीस आयुक्त गुन्हे (शोध-१) किसन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.