रेणू शर्माकडून राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश; हनी ट्रॅप रॅकेटचा भाग असल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 07:16 AM2022-04-27T07:16:21+5:302022-04-27T07:16:54+5:30
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पुढे हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष २ कडे वर्ग करण्यात आला.
मुंबई : मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्माला सोमवारी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. तसेच, पोलिसांनी तिच्या जप्त केलेल्या मोबाइलमधून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणूने राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य पक्षाच्या प्रमुख नेत्यांनाही संदेश पाठवल्याचे दिसून आले. या नेत्यांकडूनही पैशांची मागणी झाली आहे का? याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहे.
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पुढे हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष २ कडे वर्ग करण्यात आला. शर्मा हिच्यावर पाच कोटी रुपयांसह महागड्या गिफ्टची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानुसार मध्य प्रदेश येथून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. यादरम्यान पोलिसांनी तिच्याकडून मोबाइल तसेच काही कागदपत्रे जमा केली. तसेच तिने अशाच प्रकारे हनी ट्रँपद्वारे आणखीन एकाकडून पैसे उकळल्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार आली आहे.
तसेच ती आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग असल्याचा संशय सरकारी वकिलांनी न्यायालयात वर्तवला होता. तसेच, रेणू तपासाला सहकार्य करत नसून, तिने अशा प्रकारे किती जणांकडून पैसे उकळले याबाबत अधिक तपास करायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. तिचे बँक खाते मध्य प्रदेशला असल्याने त्याचाही तपास करणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले होते.