बँक लुटली! 48.40 लाख झाले अचानक गायब; कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद, घटनेने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 10:22 AM2023-08-31T10:22:52+5:302023-08-31T10:23:50+5:30
बँकेच्या शाखेतून 48 लाख 40 हजार रुपयांची रोकड गायब झाल्याची घटना समोर आली आहे.
हरियाणातील नूंह जिल्ह्यातील हरियाणा ग्रामीण बँकेच्या शाखेतून 48 लाख 40 हजार रुपयांची रोकड गायब झाल्याची घटना समोर आली आहे. सकाळी बँकेचे कर्मचारी शाखेत पोहोचले असता हा प्रकार उघडकीस आला. एवढी मोठी रक्कम बँकेतून गायब झाल्याने बँक कर्मचाऱ्यांना धक्काच बसला. बँक कर्मचाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. सध्या पोलीस कारवाईत व्यस्त आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी कर्मचाऱ्यांनी बँकेचे काम बंद करून दररोजप्रमाणे शाखा बंद ठेवली होती. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास बँकेचे कर्मचारी शाखेत पोहोचले असता त्यांना लॉकर उघडे दिसले. चौकशी केली असता शाखेतून 48 लाख 40 हजार रुपयांची रोकड गायब असल्याचे निष्पन्न झाले.
बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शाखा कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली आहे. काही वेळाने रोजका मेव पोलीस स्टेशनचे पोलीसही घटनास्थळी पोहोचले. एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. हरियाणा ग्रामीण बँकेचे प्रादेशिक व्यवस्थापक जय भगवान म्हणाले की, ते सध्या त्यांच्या स्तरावर या प्रकरणाची माहिती गोळा करत आहेत. सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बँक कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. बँकेच्या लॉकरच्या बनावट चावीच्या मदतीने हा गुन्हा करण्यात आला आहे. बनावट चावीने उघडण्याचा अनुभव फक्त कर्मचाऱ्यांना आहे. प्रत्येक लॉकरसाठी तीन चाव्या असतात, त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांची भूमिका संशयास्पद मानली जात आहे. सध्या पोलीस आणि बँक कर्मचारी काहीही बोलणं टाळत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.