म्हाडाची रूम नाही, पण ११.८५ लाखांचा चुना लागला, तक्रारदाराला आरोपींनी तीन प्रकल्प फिरवले
By गौरी टेंबकर | Published: September 4, 2023 12:19 PM2023-09-04T12:19:28+5:302023-09-04T12:20:40+5:30
दहिसर पोलिसांनी त्रिकुटावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
मुंबई: बोरिवलीत म्हाडाचे घर मिळवून देण्याचे सांगत विश्वास संपादन करून ११.८५ लाखांचा चुना लावण्यात आल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. आरोपींनी तक्रारदाराला तीन वेगवेगळ्या प्रकल्पाजवळ फिरवले मात्र रूम काही मिळाली नाही. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी त्रिकुटावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
तक्रारदार शर्मिला गोहिल (४०) या दहिसर पूर्व परिसरात दोन मुलांसह राहत असून त्यांचे पती कपडे शिवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गोविंद यांची २०१५ मध्ये दिनेश जेठवा या मित्रामुळे संजय प्रजापती, राकेश मोरे आणि भानू गुप्ता या आरोपी सोबत ओळख झाली. प्रजापतीची म्हाडा कार्यालयात चांगली ओळख असून तो म्हाडाची रूम मिळवून देईल असे त्यांना सांगण्यात आले. त्यानुसार बोरिवलीमध्ये अशोकवनची मध्यम उत्पन्न गटातील खोली प्रजापती मिळवून देणार होता.
ज्याची किंमत ही १२ लाख ८५ हजार स्टॅम्प ड्युटीसह सांगण्यात आली. तसेच काम झाल्यावर ५ लाख रुपये कमीशन घेणार असल्याचेही त्याने नक्की केले. त्याच्या सांगण्यानुसार गोहिलनी म्हाडाचा अर्ज भरला. त्यानंतर हे टोळके गोहिलना वांद्रेच्या म्हाडा कार्यालयात घेऊन गेले आणि तिथे कुलकर्णी नावाच्या व्यक्तीशी म्हाडा अधिकारी म्हणून भेट घालून देत तोच घराचे काम करणार असल्याचे त्यांना सांगितले. प्रजापतीने गोहिलकडून ३ लाख २० हजार रुपये उकळले. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांसाठी या त्रिकुटाने त्यांच्याकडून ११.८५ लाख घेतले मात्र त्यांना घर काही लागले नाही. याप्रकरणी दहिसर पोलिसात त्यांनी तक्रार दिल्यावर गुन्हा दाखल झाला.
म्हाडाचा बनावट शिक्का व खोट्या रिसीप्ट!
आरोपींनी तक्रारदाराला पैसे भरल्याच्या बनावट रीसिप्ट दिल्या. ज्यात मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, मुंबई (मिळकत व्यवस्थापक) असा शिक्का आणि सही मात्र तारीख मे २००९ ची करण्यात आली होती. त्यावर विचारणा केल्यावर जुना प्रकल्प असल्याने जुन्या पावत्या असल्याचे त्यांनी सांगितले.
ते ऑफर लेटर आमचे नाहीच...
गोहिल यांना आरोपींनी २०१६ मध्ये त्यांच्या नावाचे म्हाडाच्या लेटरहेडवर असलेले देकार पत्र (ऑफर लेटर) दिले. ते घेऊन जेव्हा तक्रारदारांनी म्हाडा कार्यालयात चौकशी केली तेव्हा असे कोणतेही पत्र आम्ही दिलेच नसल्याचे अधिकारी म्हणाले.
म्हणे नव्या प्रकल्पात रूम देतो
खोट्या ऑफर लेटरचा प्रकार उघड झाल्यावर गोहिलने प्रजापतीकडे पैसे परत मागितले. त्यावर शिंपोलीमध्ये म्हाडाच्या नवा प्रकल्पात तुम्हाला घर घेऊन देतो असे सांगत त्याने २ लाख घेतले. त्याचेही ताबापत्र बनावट निघाल्यावर मागाठाणे येथील म्हाडाच्या इमारतीमधील खोली दाखवल्याने तक्रारदाराने पैसे परत मागितले. ज्यावर त्यांना बाऊन्स चेक दिले गेले.