म्हैसाळच्या नऊ जणांवर काळ्या चहातून विषप्रयोग; पिताना संशयही आला नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 11:06 PM2022-06-28T23:06:30+5:302022-06-28T23:07:08+5:30
पोलीस तपासात निष्पन्न : सोलापूरचा मांत्रिक रुग्णालयात; दुसरा कोठडीत
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली-मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील वनमोरे कुटुंबातील नऊ जणांच्या हत्याकांडात धक्कादायक माहिती पुढे येत आहे. संशयित मांत्रिक आब्बास महंमदअली बागवान व धीरज चंद्रकांत सुरवशे (दोघे रा. सोलापूर) या दोघांनी १९ जूनच्या रात्री वनमोरे कुटुंबातील नऊ जणांना काळ्या चहामधून विषारी द्रव दिल्याचे वृत्त आहे. त्याला पोलिसांनी दुजोरा दिला. दरम्यान, मांत्रिक बागवान यास छातीत दुखू लागल्याने मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर सुरवशे याला ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
म्हैसाळ येथे दि. २० जूनला डॉ. माणिक व पोपट यल्लाप्पा वनमोरे या दोघा भावांच्या कुटुंबातील नऊ जणांचा विषारी द्रव्य पिल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले होते. पोलिसांच्या प्राथमिक तपासात खासगी सावकाराच्या त्रासाला कंटाळून त्यांनी विष पिल्याचे समोर आले होते. सखोल चौकशी केली असता, या प्रकरणात सोलापुरातील मांत्रिक बागवान व त्याचा साथीदार सुरवशे या दोघांचा सहभाग स्पष्ट झाला. बागवान मांत्रिक आहे. त्याने वनमोरे बंधूंकडून गुप्तधनाचा शोध घेण्यास मदत करण्याच्या बहाण्याने मोठी रक्कम घेतली होती. खजिन्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने वनमोरे यांनी पैशासाठी तगादा लावला. यातूनच बागवान आणि सुरवशेने १९ जून रोजी गुप्तधनाचे कारण सांगत ‘वेळ आलीय’, असा बहाणा करत प्रत्येकाला बोलावून घेत काळा चहा पाजला. त्यात विषप्रयोग करण्यात आल्याचे तपासातून पुढे आले आहे. याला एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.
दरम्यान, वनमोरे बंधूंकडे मिळालेल्या चिठ्ठ्यांवरून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात २५ सावकारांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत १९ जणांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे.
मांत्रिक बागवान यास पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, त्याच्या छातीत दुखत असल्याने मिरजेतील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुरवशे यास ७ जुलैपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.