मच्छीबाजार भागात मध्यरात्री धिंगाणा; तलवारी उपसल्या, १२ जणांवर गुन्हा
By देवेंद्र पाठक | Published: October 29, 2023 05:46 PM2023-10-29T17:46:16+5:302023-10-29T17:46:57+5:30
पोलिस कर्मचारी प्रवीण दराडे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फिर्याद दाखल केली.
धुळे : मागील भांडणाची कुरापत काढून दोन गट आपापसात भिडले. तलवार, लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ही घटना शहरातील मच्छीबाजार, माधवपुरा भागात शुक्रवारी मध्यरात्री घडली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पथक दाखल झाले. याप्रकरणी शनिवारी जणांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली. पोलिस कर्मचारी प्रवीण दराडे यांनी शनिवारी दुपारी साडेतीन वाजता फिर्याद दाखल केली.
त्यानुसार, शहरातील माधवपुरा आणि मच्छीबाजार भागात शुक्रवारी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास दोन गट अचानक एकमेकांसमोर आले. मागील भांडणाची कुरापत काढून शिवीगाळ करण्यात आली. त्यांच्यात हाणामारी सुरू झाल्याने पळापळ सुरू झाली. आरडा ओरड सुरू झाल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. दोन गटात झालेल्या हाणामारीत तलवारी, लाठ्या काठ्यांचा सर्रासपणे वापर करण्यात आला.
आझादनगर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला होता. पोलिसांना पाहताच अनेकांनी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी आझादनगर पोलिस ठाण्यात जमावाविरोधात भादंवि कलम १४३, १४७, १४८, १४९, १६०, सह भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमचे कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन कलम १३५ प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली.