भाईंदरमध्ये मायलेकाचा विष प्राशनाने मृत्यू; मृत महिलेचा दीर गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 08:24 AM2023-07-16T08:24:40+5:302023-07-16T08:25:16+5:30
राम हे दुचाकी आणण्यासाठी मित्र परमेश्वर चव्हाण सोबत गावी गेले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड : भाईंदरच्या मुर्धा गावात कविता चव्हाण (२७) व तिचा मुलगा रोहित चव्हाण (८) यांचा विष प्राशन केल्याने मृत्यू झाला असून, कविता यांचा दीर श्याम चव्हाण यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घरगुती कारणातून फिनाईल पिऊन त्यांनी आत्महत्या केल्याचा संशय असून, पोलिस तपास करीत आहेत. मुर्धा गावातील राम मंदिराजवळ पांडे चाळीत राम विश्वनाथ चव्हाण (२९) हे पत्नी कविता व मुलगा रोहित यांच्यासह महिनाभरापूर्वीच भाड्याने राहायला आले. ते मूळचे सिंदखेडराजा येथील धानोरा गावचे आहेत.
राम हे दुचाकी आणण्यासाठी मित्र परमेश्वर चव्हाण सोबत गावी गेले होते. शुक्रवार, १४ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास ते घरी परतले. बराच वेळ दार वाजवूनदेखील घराचा दरवाजा न उघडल्याने त्यांनी खिडकी जोरात ढकलली असता आतमध्ये रोहित हा निपचित पडलेला, तर पत्नी कविता जोरजोरात श्वास घेत अत्यवस्थ दिसली. राम व परमेश्वर यांनी दाराला धक्के मारून आतील कडी तोडली व दार उघडले. त्यांनी दोघांना भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी सरकारी रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी रोहितचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. तर शनिवारी पहाटे कविता यांचाही मृत्यू झाला.
कविता व राहुल यांनी काही विषारी द्रव्य घेतले आहे का, याची माहिती घेण्यासाठी पोलिस व राम हे घरी आले असता बाथरूममध्ये त्यांचा भाऊ श्याम (२७) हा बेशुद्धावस्थेत दिसला. त्यालाही जोशी रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्याम याची प्रकृती आता धोक्याच्या बाहेर असून, त्याला शुद्ध आल्यावर घटनेची माहिती पोलिसांना जाणून घेता येईल. श्याम हा वसईत राहतो व खासगी क्लासमधून पोलिस भरतीचे प्रशिक्षण घेत आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांना घरातून फिनाईलची बाटली मिळाल्याने रोहित याला फिनाईल पाजून नंतर कविता व श्याम यांनी फिनाईल पिऊन आत्महत्या केल्याची शक्यता तपासली जात आहे.
विषबाधा की आत्महत्या?
वरिष्ठ पोलिस निरीक्षक मुगुट पाटील यांनी सांगितले की, अन्नातून विषबाधा झाली की विष घेतले याबाबत शवविच्छेदन अहवालातून समजेल. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.