भंगारवाल्यांकडून घेतलेल्या दूध पिशव्यांमधून होते भेसळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:17 AM2020-03-19T04:17:12+5:302020-03-19T04:18:33+5:30
चहा विकणाऱ्यांकडून दुधाच्या रिकाम्या पिशव्या ही टोळी खरेदी करीत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे.
मुंबई : वाकोल्यात दूषित पाणीमिश्रित भेसळ दूध विक्री करणाऱ्याला गुन्हे शाखेच्या कक्ष १२ मार्फत नुकतेच गजाआड करण्यात आले. त्याच्या चौकशीत चहा विकणाऱ्यांकडून दुधाच्या रिकाम्या पिशव्या ही टोळी खरेदी करीत असल्याची प्राथमिक माहिती उघड झाली आहे. त्यानुसार पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहेत.
गेल्या शुक्रवारी सांताक्रुझच्या कलिना परिसरात भेसळीच्या दुधाचा पुरवठा करणाºया टोळीचा प्रमुख यज्ञाह चल्लाला (४९) याला गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष १२ चे प्रमुख सागर शिवलकर यांच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडून १५० लीटर भेसळीच्या दुधासह नामांकित कंपनीच्या रिकाम्या पिशव्या त्यांनी हस्तगत केल्या होत्या. त्यानुसार या पिशव्या त्याने कुठून आणल्या याबाबत पोलीस चौकशी करीत होते. वरिष्ठ अधिकाºयाने दिलेल्या माहितीनुसार, चलला याच्या चौकशीमध्ये, शहर आणि उपनगरात टपरीवर तसेच आणि सायकलवरून चहा विक्री करणाºया लोकांच्या संपर्कात त्याची टोळी आहे. त्यानुसार त्यांच्याकडे येणाºया दुधाच्या पिशव्या रिकाम्या झाल्यानंतर हे लोक त्या पिशव्या खरेदी करायचे. बºयाचदा भंगारवाले या पिशव्या घेतात. त्यानुसार त्यांच्याकडूनही पिशव्या उचलल्या जात असल्याची माहिती उघड झाली आहे. पिशव्या छापणे त्यांना परवडत नसल्याने अशाच प्रकारे विविध नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्या ते गोळा करून नंतर त्यात दूषित पाणीमिश्रित दूध भरून कधी मेणबत्ती तर कधी सिलिंग मशीनचा वापर करत त्या बंद करायचे. या पिशव्या शुद्ध दुधाच्या पिशव्यांमध्ये मिसळण्यात आल्याने सहजासहजी त्या लक्षातही येत नाहीत. त्यामुळे त्याचाच फायदा घेत भेसळीच्या दुधाचा हा व्यापार सुरू असल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
आरोपी वाकोला पोलिसांच्या ताब्यात!
या प्रकरणी शिवलकर यांना विचारले असता, ‘आम्ही संशयित आरोपीला पुढील चौकशीसाठी वाकोला पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्यामुळे याचा तपास सध्या वाकोला पोलीस करीत असून मिळालेल्या माहितीतील तथ्य पडताळणे गरजेचे आहे. जेणेकरून आरोपी तपास अधिकाºयाची दिशाभूल करू शकणार नाही,’ असे त्यांनी सांगितले.