दुधात भेसळ करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 6 आरोपींना ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 09:20 PM2018-09-12T21:20:20+5:302018-09-12T21:32:48+5:30
मुंबई - दुधाच्या पिशवीत नळावरील पाण्याची भेसळ करून दुधाची विक्री करणाऱ्या सहा जणांना गुन्हे शाखेच्या कक्ष 11 च्या पोलिसांनी मालाड क्वाँरी रोड येथून पहाटे अटक केली आहे. कृष्णा मल्लय्य अंबती(वय 49), अंजना नरसिम्मा मुतियाला ( वय 32), शंकर रच्चामल्ला (वय 19), सईदुल्ला अलिती (वय 35), सुजत मुतियला (वय 25), रामुल्लमा राचमल्ला (वय 40) अशी या आरोपींची नावे आहेत. या आरोपींजवळून पोलिसांनी छापा टाकून 429 दुधाच्या पिशव्या जप्त केले.
मालाडच्या क्वारीरोड परिसरात पहाटे काहीजण दुधाची भेसळ करत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष 11 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चिमाजी आढाव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सापळा रचून यी सहा जणांना दुधात भेसळ करताना रंगेहाथ अटक केली. हे सर्व जण गोकुळ, अमूल आणि आरे या दुधाच्या पिशवी फोडून त्यात पाण्याची भेसळ करत होते. पोलिसांनी या आरोपींजवळून 500 मिलीच्या 429 भेसळयुक्त दुधाच्या पिशव्या हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणी पोलिसांनी दिंडोशी पोलिस ठाण्यात 474/18 नुसार भा.दं.वि. कलम 272, 482,483,420, 468, 34 सह 7,16 या अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहेत. या टोळी मागे गोरेगावच्या एका मुख्य व्यक्तीचा हात असल्याची माहिती चौकशीतून पुढे आली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहे.