दुधविक्रेत्यावर चाकुने हल्ला, चार हजार रुपये लुटले
By प्रदीप भाकरे | Published: March 14, 2024 01:40 PM2024-03-14T13:40:17+5:302024-03-14T13:41:14+5:30
रेल्वे स्टेशनसमोरील घटना : सिटी कोतवालीत गुन्हा दाखल
अमरावती: एका दुधविक्रेत्याला थांबवून त्याच्यावर चाकुने वार करण्यात आले. तथा त्याच्याकडील चार हजार रुपये हिसकावण्यात आले. सशस्त्र लुटीची ही घटना १२ मार्च रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास रेल्वे स्टेशनसमोरील एका बारजवळच्या दुभाजकानजिक घडली. याप्रकरणी, सर्वेश काळपांडे (२९, रा. वडगाव माहुरे) याच्या तक्रारीवरून शहर कोतवाली पोलिसांनी १३ मार्च रोजी पहाटे अज्ञात तीन ते चार जणांविरूध्द खुनाचा प्रयत्न व अन्य कलमांन्वये गुन्हा दाखल केला.
१२ मार्च रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सर्वेश हा आपल्या दुचाकीने दुध वाटप करण्यासाठी रेल्वे स्टेशन चौकाकडून ईर्विन चौकाकडे जात होता. तेव्हा त्या रस्त्यावरील वाईन शॉप जवळील डिव्हायडरमधून ३ ते ४ अनोळखी इसम रोड क्रॉस करत होते. त्यावेळी सर्वेशच्या दुचाकीचा त्यांना कट लागला. त्यामुळे सर्वेशने दुचाकी थांबविली. तर आरोपींनी एकदमच शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्या अनोळखी चारही इसमानी सर्वेशला खाली ओढले. तथा मारहाण सुरू केली. साले हमको जानता नही क्या, तेरेको खत्म कर देंगे, असे म्हणून चौघांपैकी एकाने सर्वेशच्या पोटावर चाकुने वार केला. मात्र वाचण्यासाठी त्याने उजवा पाय वर केल्याने त्या आरोपीने त्याच्या उजव्या पायाच्या मांडीवर चाकुने दोन ते तीन वार केले. त्यामुळे त्याच्या मांडीतुन रक्त स्त्राव होऊ लागला. त्यावेळी त्यातीलच एका अनोळखी इसमाने सर्वेशच्या पॅन्टच्या खिशातून दुधाच्या विक्रीचे ४ हजार रुपये बळजबरीने काढले. तथा चौघेही तेथून पळून गेले. काही प्रत्यक्षदर्शींनी सर्वेश काळपांडे याला जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले.