थर्टी फर्स्टसाठी आले लाखोंचे हेरॉइन! एकाला अटक, राजस्थानमधून अमली पदार्थ विक्रीला
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 08:35 AM2022-12-14T08:35:28+5:302022-12-14T08:35:40+5:30
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने राजस्थानमधून अमली पदार्थ आणले होते. शेख याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : थर्टी फर्स्टला आयोजित एका कार्यक्रमात विकण्यासाठी तब्बल ५० लाख रुपयांचे हेरॉइन मुंबईत विक्रीसाठी आणण्यात आल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणी मालवणी पोलिसांकडून सोहेल अहमद शेख (३५) नामक बाउन्सरला अटक करण्यात आली आहे.
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख याने राजस्थानमधून अमली पदार्थ आणले होते. शेख याच्यावर एनडीपीएस कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. शेख याला सहायक पोलिस निरीक्षक नीलेश साळुंखे आणि त्यांच्या पथकाने रविवारी रात्री मालवणी येथील मोहम्मद रफिक मैदानाजवळ पकडले. पोलिस उपायुक्त अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधातील कारवाई दरम्यान संशयास्पदपणे बॅग घेऊन जात असताना शेख आढळला होता. वरिष्ठ निरीक्षक शेखर भालेराव यांच्या पथकाने केलेल्या चौकशीत तो एका खासगी एजन्सीशी संलग्न असून पार्ट्या आणि कार्यक्रमांमध्ये सेलिब्रिटी आणि व्यावसायिकांना ड्रग्ज देत असल्याचे उघड झाले.
असा सापडला जाळ्यात
सोहेल अहमद शेख गेल्या आठवड्यात हेरॉइन घेऊन मुंबईत आला आणि पार्ट्यांच्या ऑर्डर घेत होता. मात्र ग्राहकाची वाट पाहत असताना तो जाळ्यात सापडला. मालवणीत आठवडाभरातील ही दुसरी मोठी अटक आहे. बुधवारी, कांदिवलीच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सुमारे १.१२ कोटी रुपयांच्या २८० ग्रॅम हेरॉइनसह एका आरोपीला अटक केली.
नोकरी गमावल्याने लागला वाईट मार्गाला
काही महिन्यांपूर्वी, सोहेल अहमद शेख याने नोकरी गमावली. त्याला उदरनिर्वाह करणे कठीण झाले.
त्यानंतर त्याचा मित्र आणि तो राजस्थानला गेला, तेथे तो
एका ड्रग्ज तस्कराला भेटला आणि पार्ट्यांमध्ये विकण्यासाठी ड्रग्जची मागणी केली.
व्यापाऱ्याचा शेखवर विश्वास होता आणि त्याने त्याला एक पैसाही न घेता अमली पदार्थ दिले, असेही पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले.