एमआयएमचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशीला अटक; इतर १०० जणांविरोधातही गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 07:00 PM2018-08-18T19:00:02+5:302018-08-18T19:01:50+5:30
दहशत निर्माण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी एमआयएम पक्षाचा शहराध्यक्ष जावेद कुरेशीसह १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा नोंदविला.
औरंगाबाद: घाटी परिसर आणि टाऊन हॉल येथे पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आणि गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत निर्माण केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी एमआयएम पक्षाचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशीसह १०० ते १५० जणांविरोधात गुन्हा नोंदविला. रात्री उशीरा पोलिसांनी जावेदला अटक करून सिटीचौक ठाण्याच्या लॉकअपमध्ये डांबले. न्यायालयाने त्याला २१पर्यंत पोलीस कोठडी ठोठावली.
पोलिसांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत शुक्रवारी दुपारी एमआयएम पक्षाचा नगरसेवक सय्यद मतीनला भाजपा नगरसेवकांनी मारहाण केली. मारहाणीनंतर मतीन घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. या बाबतची माहिती मिळताच एमआयएमचा माजी शहराध्यक्ष जावेद कुरेशी हा कार्यकर्त्यांसह घाटीत दाखल झाला. त्यावेळी त्याने प्रचंड आरडाओरड करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
तेथे कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यास घाटीतून निघून जाण्याचे सांगितले. मात्र त्याने ऐकले नाही.नंतर काही वेळाने तो कार्यकर्त्यांसह टाऊन हॉलकडे गेला. तेथील दुकाने त्याने बळजबरीने बंद कराला लावली. टाऊन हॉल येथे कर्तव्यावरील पोलिसांनाही त्याने जुमानले नाही. त्यांच्या सरकारी कामात अडथळा आणण्याचे काम त्याने केले. याबाबत पोलीस हेड काँन्स्टेबल प्रसन्नजीत सातदिवे यांनी आरोपी जावेदसह १०० ते १५० कार्यकर्त्यांविरोधात तक्रार नोंदविली. जावेदविरोधात गुन्हा नोंद होताच पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच त्याच्या घरातून जावेदला उचलले. नंतर ठाण्यात नेऊन त्याला रितसर अटक केली. त्याला रात्रभर सिटीचौक ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.