मन सुन्न करणारी घटना! खेळत असलेल्या चिमुकलीला नराधमाने घरी नेऊन केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 09:13 PM2021-11-08T21:13:51+5:302021-11-08T21:14:42+5:30
Rape on Kid in Roha : नराधम राकेश शिर्के (36) याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.
रोहा - रोहा तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना रविवारी घडली. अवघ्या 5 वर्षाच्या बालिकेवर 36 वर्षाच्या नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आल्याने एकच संताप व्यक्त झाला. रविवारी सायंकाळी आरोपी राकेश शिर्के याने अल्पवयीन मुलीला घरी नेवून लैंगिक अत्याचार केले, आरोपीला पोलिसांनी रात्री उशीरा अटक केल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली. मुलीला अधिक उपचारार्थ अलिबाग येथे हलविण्यात आले आहे.
रोहा तालुक्यात लैंगिक अत्याचाराच्या घटनांमध्ये अलिकडे वाढ झाली आहे. अत्याचाराचे सत्र सुरु असतानाच रविवारी सायंकाळी रोहा शहरातील पार्टे चाळीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची खळबळजनक घटना घडली. सायंकाळी 6 च्या सुमारास लहानगी अंगणात खेळत होती. खेळता-खेळता ती अचानक बेपत्ता झाल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या मुलीचा आजी-आजोबांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी नराधम राकेश शिर्के वय 36 याने लहानगीला स्वतःच्या घरी नेवून लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. चाळीचे मालक चंद्रकांत पार्टे यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली.
आरोपीने सबंधीत मुलीवर अत्याचार केला. ही माहिती पोलिसांना समजताच आरोपीने पळ काढला. फिर्यादीच्या म्हणण्यावरुन सदर आरोपी राकेश शिर्के याच्या विरुद्ध 376, 378(2)(i)(i), 376 (3), 363 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तदनंतर आरोपीला रोहा पोलिसांनी तातडीने अटक केली. अधिक तपास पेण उपविभागीय पोलीस अधिकारी व्ही.व्ही. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक तृप्ती बोराडे करीत आहेत. दरम्यान, रोहा तालुक्यात यापुर्वी तांबडी सामुहिक बलात्कार, पेण येथील अल्पवयीन मुलीवर अष्टमी परिसरात लैंगिक अत्याचार प्रकरणे घडली आहेत. त्यांचा तपास अद्याप सुरु आहे. या घटना ताज्या असतानाच रविवारी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याने माणुसकी व कायदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न रोहा तालुक्यात निर्माण झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.