मौजमजेसाठी अल्पवयीन मुलगा चोरायचा वाहने
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 04:22 PM2019-02-23T16:22:37+5:302019-02-23T16:24:32+5:30
त्याच्याकडून आठ दुचाकी आणि एक रिक्षा अशी नऊ वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत.
ठाणे - मुंबई आणि ठाणे परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या १६ वर्षीय मुलाला कळवापोलिसांनीअटक केली आहे. त्यांनतर त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे. त्याच्याकडून आठ दुचाकी आणि एक रिक्षा अशी नऊ वाहने पोलिसांनी हस्तगत केली आहेत. पोलीस तपासात तो मौजमज्जेसाठी वाहनांची चोरी करून त्याची विक्री करत असल्याचं उघडकीस आलं आहे.
गेल्या काही महिन्यांपासून ठाण्यात वाहन चोरीच्या एकामागोमाग एक घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर ठाणे पोलिसांनी चोरटय़ांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. गुरुवारी मध्यरात्री पोलीस निरीक्षक सचिन गावडे यांचं पथक कळवा परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी दुचाकीवरून संशयास्पदरित्या जाणाऱ्या एका मुलाला पथकाने त्यांनी अडवले. विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत असल्यामुळे पथकाने त्याची कसून चौकशी केली. या चौकशीत त्याने वाहन चोरीच्या गुन्ह्य़ाची कबुली दिली. त्याने मुंबई आणि ठाणे परिसरात यापूर्वी ९ वाहने चोरल्याची कबुली दिली असून ही वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत. चोरलेली वाहने ८ ते १० हजार रुपयांना तो विकत असे. तो दहावी नापास असून मौजमजेसाठी चोऱ्या करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.