खळबळजनक! मंत्री गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार; थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2022 10:20 AM2022-04-23T10:20:53+5:302022-04-23T10:22:13+5:30
राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
नेवासा (जि. अहमदनगर) : राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे स्वीय सहाय्यक राहुल राजळे यांच्यावर तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी पाच गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या दरम्यान. तालुक्यातील लोहगाव या गावात ही घटना घडली असल्याचे समजते.
राजळे हे लोहगाव येथे येताच अज्ञात आरोपींनी त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्यात राजळे यांच्या कमरेखाली एक व डाव्या पायाला एक गोळी लागली तर डाव्या हाताला एक गोळी चाटून गेली आहे.
जखमी अवस्थेत राजळे यांना रात्रीच अहमदनगरच्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असुन मध्यरात्री त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांचे बंधू विकास राजळे यांनी सांगितले.पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शेवगाव विभागाचे पोलिस उपअधीक्षक सुदर्शन मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांनी रात्रीच परिसरातील सर्व रस्त्यावर नाकेबंदी करुन आरोपीचा शोध सुरु केला. दरम्यान, मंत्री गडाख यांच्या स्वीय सहायकावर गोळीबार झाल्याने खळबळ उडाली आहे.