'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 14:39 IST2024-12-28T14:36:15+5:302024-12-28T14:39:49+5:30
Crime News: उत्तर प्रदेशात एका प्रकरणाने खळबळ उडाली आहे. एका मुलीने तिच्या वडील, काका आणि आजोबावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी तिघांनाही अटक केली आहे.

'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती
Crime News in Marathi: एक अल्पवयीन मुलगी तिच्या एका नातेवाईक महिलेसोबत पोलीस ठाण्यात आली. तिने जे सांगितले ते ऐकून पोलिसही हादरले. वडील, काका आणि आजोबांकडून वर्षभरापासून अत्याचार करण्यात आल्याचे या पीडितीने सांगितले. ही मुलगी दोन महिन्यांची गर्भवती असून, या घटनेने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोप करण्यात आलेल्या तिघांनाही अटक केली.
उत्तर प्रदेशातील ओरिया जिल्ह्यात ही संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलगी दोन महिन्यांची गर्भवती आहे.
२६ डिसेंबर रोजी पीडित मुलगी एका नातेवाईक महिलसोबत पोलीस ठाण्यात आली होती. पीडितेने पोलिसांना सांगितले की, तिचे वडील, काका आणि आजोब अनेक महिन्यांपासून अत्याचार करत आहेत. त्यामुळे ती गर्भवती राहिली आहे.
या प्रकरणाबद्दल ओरियाचे पोलीस अधीक्षक आलोक मिश्रा यांनी माहिती दिली. 'पीडित मुलीने पोलिसांना सांगितले की, ती दोन महिन्यांची गर्भवती आहे. त्यामुळे तिला वैद्यकीय चाचणीसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणात पोलिसांनी पोक्सोसह इतर कलमान्वये आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे', असे मिश्रा यांनी सांगितले.
"तिघांकडून पीडित मुलीच्या आईवरही अत्याचार"
पोलिसांनी सांगितले की, पीडित मुलीने अशी माहिती दिली की, कुटुंबातील व्यक्ती सातत्याने अत्याचार करत होते. त्यामुळे ती आईसोबत दुसऱ्या राज्यात निघून गेली होती आणि तिथे राहत होती. पण, तिचे वडील, काका आणि आजोबा पीडिता राहत असलेल्या ठिकाणी गेले आणि दोघींनाही घेऊन परत आले. वडील, काका आणि आजोबा आईवरही अत्याचार करत होते, असा दावाही पीडितेने केला आहे.
घरी परतल्यानंतर आईचा मृत्यू
पीडित मुलीने सांगितले की, ती आईसह परत घरी आली. त्यानंतर काही दिवसात तिच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिन्ही आरोपींनी पीडितेवर अत्याचार करायला सुरूवात केली. वडील, काका आणि आजोबा सतत अत्याचार करत असल्याने पीडितेने तिच्या जवळच्या नातेवाईक महिलेला ही सगळी आपबीती सांगितली. त्यानंतर महिला तिला घेऊन पोलीस ठाण्यात आली.
पोलिसांनी तक्रार दाखल करून तिघांना अटक केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.