टेबल टेनिस प्रशिक्षकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 01:37 PM2018-10-06T13:37:16+5:302018-10-06T13:39:50+5:30
बारा वर्षीय मुलीला अश्लील दृष्टिकोनातून दररोज सर्वांगाला बॅड स्पर्श करून तिचा विनयभंग करणाºया प्रशिक्षकाविरुद्ध सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
अकोला : शहरातील क्रीडा क्षेत्रातील वातावरण अत्यंत कलुषित झाले आहे. एकापाठोपाठ क्रीडा प्रशिक्षकांकडून मुलींच्या लैंगिक शोषणाच्या, विनयभंगाच्या घटना समोर येत आहेत. शुक्रवारी सायंकाळी अशीच एक घटना उघडकीस आली. सहा वर्षांपासून टेबल टेनिसचे धडे घेण्यासाठी जाणाऱ्या बारा वर्षीय मुलीला अश्लील दृष्टिकोनातून दररोज सर्वांगाला बॅड स्पर्श करून तिचा विनयभंग करणाºया प्रशिक्षकाविरुद्ध सिव्हिल लाइन पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांची बारा वर्षीय मुलगी सहा वर्षांपासून राऊतवाडीतील टेबल टेनिस शिकविणारा महेंद्र कोठारी याच्याकडे जायची. गत महिनाभरापासून प्रशिक्षक महेंद्र कोठारी (५0) हा मुलीवर वाईट नजर टाकून होता. संधी मिळेल तेव्हा तो या मुलीसोबत अश्लील चाळे करायचा. तिच्या सर्वांगावर वाईट उद्देशाने स्पर्श करायचा; परंतु ही बाब मुलीने घरी सांगितली नाही. प्रशिक्षकाच्या वर्तणुकीमुळे मुलीच्या कोवळ्या मनावर विपरीत परिणाम झाला. ती घरी फारशी कोणाशी बोलायची नाही. सातत्याने चिडचिड करायची. ही तिच्या आईच्या लक्षात आल्यावर, तिने मुलीला विश्वासात घेतले आणि तिला विचारणा केली. तेव्हा मुलीने आपबिती कथन केली. प्रशिक्षकाकडून होत असलेला अत्याचार पाहून, आईला धक्काच बसला. आईने मुलीला सोबत घेऊन शुक्रवारी सिव्हिल लाइन पोलीस ठाणे गाठले आणि टेबल टेनिस प्रशिक्षक महेंद्र कोठारी याच्याविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम ३५४, ३५४ (अ)(१) सहकलम ११, १२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी महेंद्र कोठारी याला अटक केली.(प्रतिनिधी)
क्रीडा प्रशिक्षकाकडून अत्याचाराची चौथी घटना
क्रीडा प्रशिक्षकांमुळे क्रीडा क्षेत्राला काळिमा फासल्या जात आहेत. पालक या प्रशिक्षकांवर विश्वास ठेवून आपली मुले-मुली त्यांच्या ताब्यात सोपवितात; परंतु काही क्रीडा प्रशिक्षक गुरू-शिष्याच्या नात्याला कलंकित करण्याचे कृत्य करीत असल्याचे घडलेल्या घटनांवरून समोर येत आहे. जिल्हा क्रीडा संकुलांतर्गत जिम्नॅस्टिक प्रशिक्षक मुकेश तुंडलायत याने दोन मुलांचे लैंगिक शोषण केले होते. त्यानंतर कबड्डी प्रशिक्षक शुद्धोधन अंभोरे याने एका मुलीचे लैंगिक शोषण केले. आयएमए हॉलमध्ये वर्ग घेणाºया बॅडमिंटन प्रशिक्षक राहुल सरकटे यानेसुद्धा त्याच्याकडे बॅडमिंटन शिकण्यासाठी येणाºया युवतीचे लैंगिक शोषण केले होते. शुक्रवारी टेबल टेनिस प्रशिक्षकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. प्रशिक्षकांकडूनच कोवळ्या मुला-मुलींचे शोषण होत असेल, तर पालकांनी कुणावर विश्वास ठेवावा, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.