Video : जुहू परिसरात अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या; आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2019 03:12 PM2019-04-06T15:12:44+5:302019-04-06T15:30:41+5:30
आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.
मुंबई - जुहू परिसरातील सार्वजनिक शौचालयात ९ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेबाबत जुहू पोलिसांनी देवेंद्र वड्डी (३५) याला अटक केली आहे.
गेल्या २ दिवसांपासून मृत मुलगी बेपत्ता होती. तिचा शोध सुरू असताना आज ती एका सार्वजनिक शौचालयात मृतावस्थेत आढळली. तिच्यावर बलात्कार झाल्याचं वैद्यकीय तपासणीनंतर निष्पन्न झालं. त्यानंतर पोलीस तपासात देवेंद्र वड्डी याच्या चौकशीत पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर गुन्हा उघड झाला. आरोपी वड्डी हा याच परिसरात राहणारा असून त्याच्यावर अगोदर देखील काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी आरोपीला अटक केली असली तरी या भागात प्रचंड तणाव आणि खळबळ माजलेली आहे. आरोपीला ताब्यात देण्याची मागणी करत संतप्त नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे. भा.दं.वि. कलम 302, 376, 201 सह पॉक्सो कायदा 4, 8, 12 अन्वये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.