घरासमोर बसलेल्या अल्पवयीन मुलीवर कारमधून आलेल्या अज्ञातांनी झाडल्या गोळ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 09:48 PM2021-03-07T21:48:18+5:302021-03-07T21:49:36+5:30
Firing Case : गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
घरासमोर बसलेल्या एका अल्पवयीन मुलीवर कारमधून आलेल्या काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हा धक्कादायक प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली. या हल्ल्यात मुलीला दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी मुलीला रुग्णालयात दाखल केलं आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना झारखंडची राजधानी रांची येथील आहे. हल्लेखोरांनी दिवसा ढवळ्या एका मुलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. या हल्ल्यात संबंधित मुलगी गंभीर जखमी झाली आहे. तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. तिची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. १४ वर्षीय रुचीच्या पायाला आणि हाताला गोळी लागली आहे. ही घटना रांचीच्या पंडरा ओपी परिसरात घडली आहे. पोलीस या प्रकरणाचा संपूर्ण तपास करीत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंडरा ओपी येथे कारमधून आलेल्या तीन हल्लेखोरांनी रुची कुमारी नावाच्या एका अल्पवयीन मुलीवर गोळ्या झाडल्या आहेत. या गोळीबारात रुचीला दोन गोळ्या लागल्या आहेत. गोळ्या लागल्यानंतर ती जमिनीवर कोसळली. दरम्यान बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजाने परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. इतक्यात हल्लेखोर कारमध्ये बसून फरार झाले आहे. जखमी रुचीनं सांगितले, ती घराच्या बाहेर बसली होती, तेव्हा कारमधून तीन हल्लेखोर आले आणि त्यांनी तिच्यावर गोळीबार सुरू केला. मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रुची कुमारीचे मामा विकास सिंह यांना गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्यांची तुरूंगात रवानगी केली आहे. त्यामुळे या गांजा कनेक्शनच्या वादातूनच हा हल्ला झाला असावा, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे पंडारा परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत आहेत, अशी माहिती न्यूज १८ने दिली आहे.