बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचे दागिने भामट्याने विकले हैदराबादला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2019 09:34 PM2019-09-13T21:34:30+5:302019-09-13T21:36:25+5:30
दोन्ही भावांनी हैदराबादला पळ काढला होता.
मडगाव - हैदरबाद येथील मॉस्ट वॉन्टेड महमद इसाक (22) याने गोव्यातील नावेली येथील एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिचे लुटलेले सोन्याचे दागिने हैदराबाद येथे विकले होते. तेथील तीन दुकानात त्याने हे सोने विकले होते. मडगाव पोलिसांच्या पथकाने काल हैदरबाद येथे जाउन हे सोने जप्त केले आहे. गोव्यातही त्याने काही सोने विकल्याचा संशय आहे. दरम्यान, अधिक चौकशीसाठी या संशयिताच्या पोलीस कोठडीत वाढ केली आहे. आज त्याला न्यायालयात उभे केले असता, सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आल्याची माहिती मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांनी दिली.
तब्बल सहा महिन्याने महमद इसाक हा मागच्या आठवडयात पोलिसांना शरण आला होता. त्यापुर्वी 28 ऑगस्ट रोजी हे दागिने पळविण्यास संशयिताला मदत करणारा त्याचा भाऊ जब्बार अहमद याला मडगाव पोलिसांनी हैदराबाद येथे जाऊन अटक केली होती. सदया जब्बार याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. 24 मे 2019 रोजी या अल्पवयीन मुलीच्या आईने मडगाव पोलीसात तक्रार केली होती. या तक्रारीप्रमाणे, आरोपी इसाक याने नावेलीतील ती अल्पवयीन मुलगी टय़ूशनला जाताना तिच्याशी सलगी वाढवली. नंतर बळजबरीने तिला कोलवा आणि इतर ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. यावेळी त्याने तिचे विवस्त्रवस्थेतील फोटोही घेतले होते. हेच फोटो लोकांना दाखविणार अशी धमकी देऊन संशयिताने तिला घरातून दागिने आणण्यास भाग पाडले. हे दागिने संशयिताचा भाऊ जब्बार याने तिच्या फ्लॅटमध्ये येऊन घेतले होते. या प्रकरणाचा गवगवा होणार याचा सुगावा लागल्यावर या दोन्ही भावांनी नंतर हैदराबादला पळ काढला होता.
मे 2017 ते जानेवारी 2019 पर्यंत आरोपीने त्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले होते. या प्रकरणाची तक्रार दाखल झाल्यानंतर मडगाव पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सुजय कोरगावकर यांच्यासह पोलीस शिपाई गोरखनाथ गावस व विजयकुमार कामठाण यांचे पथक हैदराबादला रवाना झाले होते. त्यांनी मुख्य आरोपीचा भाऊ जब्बार याला 28 ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले. भावाला अटक झाल्यामुळे निरुपायाने शेवटी इसाकही नंतर मडगाव पोलिसांना शरण आला होता.इसाक याने कित्येकांना गंडा घातलेला असून हैदराबाद पोलिसांसाठीही तो वॉन्टेड आहे.