अल्पवयीन मुलींना करतात अश्लील नृत्यासाठी सक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 07:07 AM2021-12-29T07:07:39+5:302021-12-29T07:11:16+5:30
Crime News : मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात.
- मनोज ताजने
गडचिरोली : गोरगरीब कुटुंबातील अल्पवयीन मुलींना हेरायचे, त्यांना ग्लॅमरस दुनियेचे स्वप्न दाखवून भुरळ घालायची आणि थेट उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात नेऊन त्यांच्याकडून अश्लील नृत्यासारखे प्रकार करवून घ्यायचे, असा धंदा काही लोकांकडून सुरू आहे. त्याला गडचिरोली जिल्ह्यातील काही मुली बळी पडल्या आहेत.
मजूर कुटुंबांमधील, वडीलधाऱ्या व्यक्तीचा आधार नसलेल्या कुटुंबातील मुलींना हेरले जाते. सिनेमात काम करण्याची संधी मिळेल, पैसा मिळेल, अशी स्वप्ने दाखविली जातात. मुलगी नाव कमावेल, पैसाही मिळेल म्हणून कुटुंबातील लोक तयार होतात. सुरुवातीला कुटुंबीयांच्या बँक खात्यावर पैसे टाकले जातात. त्यामुळे मुलगी मजेत आहे असा कुटुंबीयांचा समज होतो; पण नंतर तिच्याकडून हवे ते करवून घेतले जाते. आरमोरी शहराजवळच्या गावातील एक मुलगी अशीच सध्या उत्तर प्रदेशात अडकून पडली आहे. असहाय आई तिला ‘त्या’ लोकांच्या तावडीतून कसे सोडवून आणायचे या विवंचनेत आहे.
ही पीडित अल्पवयीन मुलगी चंद्रपूर जिल्ह्यात एका व्यक्तीकडे नृत्य शिकण्यासाठी गेली होती. तिच्याबद्दल माहिती घेऊन उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने तिच्या आईशी संपर्क केला. तुझी मुलगी चांगली डान्सर आहे, तिकडे सिनेमात काम मिळवून देतो, असे आमिष देत सोबत नेले. काही दिवस आईच्या बँक खात्यावर पैसेही टाकले. आता मुलीचा संपर्कही बंद केला आहे.
बदनामीच्या भीतीपोटी तक्रारच नाही
पूर्व विदर्भात दिवाळी ते होळीयादरम्यान ‘मंडई’ उत्सवात ‘डान्स हंगामा’, ‘छत्तीसगडी धमाका’ अशा नावांनी तिकीट लावून नृत्याचे कार्यक्रम होतात. त्यात तोकड्या कपड्यातील मुलींकडून अश्लील नृत्य करवून घेतले जाते.
उत्तर प्रदेश-मध्य प्रदेशातही अशा कार्यक्रमांसाठी मुलींना फूस लावून नेले जाते.