लॉकडाऊनमध्ये मीरा भाईंदर पोलिसांचा वाहन जप्तीचा धडाका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2020 11:58 PM2020-04-10T23:58:40+5:302020-04-10T23:59:21+5:30
एका दिवसात तब्बल १६० वाहनं जप्त करत २३ सामुहिक गुन्हे दाखल
मीरारोड - कोरोनाचा संसर्ग पसरु नये म्हणून मीरा भाईंदरमध्ये ठाणे ग्रामीण पोलीसांनी आता बेशिस्त लोकांवर कारवाईचा धडाका सुरु केला आहे. गुरुवारी एका दिवसात परवाना नसताना वाहनं घेऊन फिरणाऱ्या १५० पेक्षा जास्त लोकांवर सामुहिक २३ गुन्हे दाखल करत १५७ दुचाकी व ३ रिक्षा अशी १६० वाहनं जप्त केली आहेत. सर्वात जास्त ६७ वाहनं भाईंदर पोलीसांनी जप्त केली आहेत.
शहरात जीवनावश्यक तसेच अत्यावश्यक सेवा वगळता अनेक बेशिस्त लोकं बंदी असून देखील सर्रास वाहनं घेऊन फिरत असल्याने त्यांना आळा घालण्यासाठी ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या दुचाकी, तीनचाकी, कार आदी वाहनांना रस्त्यावर आणण्यास बंदी घालण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला होता. पोलीसांचा हा प्रस्ताव जिल्हाधिकारायांनी मंजुर केला.
जिल्हाधिकाऱ्यांच्या वाहन बंदीच्या आदेशानंतर डॉ. राठोड व अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात वाहनांवर कारवाईची धडक मोहिम सुरु करण्यात आली आहे.
भाईंदर विभागीय हद्दीत उपअधीक्षक शशिकांत भोसले तर मीरारोड उपअधीक्षक शांताराम वळवींनी कारवाईचे नियोजन केले. भाईंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह एका दिवसात ६५ दुचाकी व २ रिक्षा अशी ६७ वाहनं जप्त करुन ६ सामुहिक गुन्हे दाखल केले आहेत.
नवघरचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार यांनी ६१ दुचाकी जप्त करुन १ सामुहिक गुन्हा दाखल केला. उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे सतिश निकम यांनी ४ दुचाकी जप्त व १ गुन्हा ; काशिमीरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी १० दुचाकी व १ रिक्षा जप्त करुन ४ गुन्हे ; नया नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक कैलास बर्वे यांनी १५ दुचाकी जप्त करुन १ गुन्हा तर मीरारोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदिप कदम यांनी २ दुचाकी जप्त करुन ३ गुन्हे दाखल केले आहेत.
शहरातील सदर ६ पोलीस ठाण्यांनी नाकाबंदी करुन ही कारवाईची मोहिम सुरु केली असुन मोठ्या संख्येने दुचाकी वाहनं जप्त करुन गुन्हे दाखल केल्याने बेशिस्तां मध्ये घबराट माजली आहे. भाईंदर व नवघर पोलीस ठाण्याचा परिसर तर जप्त केलेल्या दुचाकींनी तुडुंब भरुन गेला होता. वाहन सोडवण्यासाठी पकडले गेलेले बेशिस्त पोलीसांकडे गयावया करत होते. सदरची कारवाई रोज सुरुच राहणार असल्याचे उपअधीक्षक भोसले यांनी सांगितले.