भाईंदरच्या अभियंत्यावर बोरिवलीत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 06:52 AM2021-09-30T06:52:22+5:302021-09-30T06:53:10+5:30
नॅशनल पार्कजवळील घटना
मुंबई : मीरा-भाईंदर महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार होण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी बोरिवली परिसरात घडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून गोळी कारला लागल्याने कार्यकारी अभियंते थोडक्यात वाचले. नुकत्याच ठाणे येथील कल्पिता पिंपळेंवर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
बोरिवली पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरील कृष्णा इमारतीजवळ कार्यकारी अभियंते दीपक खांबित हे त्यांच्या कारमध्ये असताना रेनकोट घातलेल्या दोन अनोळखी मोटारसायकलस्वारांनी त्यांच्यावर गोळीबार केला. संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास खांबीत हे मीरा-भाईंदर महापालिकेच्या कार्यालयातून त्यांच्या बोरिवली येथील घरी परतत असताना हा प्रकार घडला.
हल्लेखोरांनी खांबित यांच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. मात्र, सुदैवाने हल्लेखोरांचा नेम चुकल्याने ते बचावले. या गोळीबाराची माहिती मिळताच कस्तुरबा पोलीस, तसेच परिमंडळ १२चे पोलीस उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी आणि वरिष्ठांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. खांबित यांच्यावर हल्ला करणारे कोण, याची चौकशी करण्यासाठी त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. त्यांना कोणाकडून धमकी मिळाली होती का, याचीही माहिती घेतली जात आहे.
पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेजही पडताळले जात आहेत. घटनास्थळाहून काडतुसाच्या पुंगळ्या पोलिसांनी हस्तगत करीत हल्ल्यासाठी नेमके कोणते अग्निशस्त्र वापरले गेले याचा शोध घेतला जात आहे. पोलीस आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह
ठाण्यातील सहायक आयुक्तांवर झालेल्या हल्ल्यानंतर आता मुंबईत पालिका अधिकाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.