मीरा रोडमध्ये सनातन यात्रेवर हल्ला; ध्वज फाडले, वाहने फोडली; परिसरात तणावाची परिस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 09:07 AM2024-01-22T09:07:29+5:302024-01-22T09:11:47+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, दोन जातीयवादी गट समोरासमोर आले. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले.
Ram Mandir, Mira Road Violence: अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याबाबत देशभरात आणि परदेशात जोरदार चर्चा सुरू आहे. अनेक ठिकाणी सनातन धर्म यात्रा काढण्यात आल्या. तशातच ठाण्यातील मीरा-भाईंदरमध्ये काढण्यात आलेल्या सनाटक धर्म यात्रेदरम्यान गोंधळ झाल्याची घटना घडली. वाहनांतून राम आणि हनुमानाचे झेंडे घेऊन जाणारे लोक जय श्री रामच्या घोषणा देत होते. यात्रेदरम्यान काही लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन वाहनांवर हल्ला केल्याचा आरोप आहे. त्यांनी काही ध्वज फाडल्याचा आरोप आहे. वाहनांची तोडफोड केल्याचेही आरोप केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन जातीयवादी गट समोरासमोर आले. वाढता तणाव पाहून पोलिसांनी घटनास्थळ गाठून प्रकरण शांत केले. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मीरा रोडवर घडलेल्या या घटनेबाबत सोशल मीडियावर लोकांनी हल्लेखोरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी होत आहे. अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये संतप्त जमावाने यात्रेत सहभागी महिलांवरही हल्ला केल्याचा आणि त्यांना शिवीगाळ, मारहाण करून जखमी केल्याचा दावा केला जात आहे.
सनातन यात्रा काढणाऱ्या लोकांनी केलेल्या आरोपानुसार, ते ध्वज घेऊन शांततेने जात होते. मीरा-भाईंदरमधून जात असताना अचानक यात्रेत निघालेल्या वाहनांसमोर काही विशिष्ट समाजाचे लोक उभे राहिले. त्यांनी वाहनांवर हल्ला केला. वाहनांवरील ध्वज हिसकावून फाडण्यात आले. मिळालेल्या माहितीच्या आधारे, २१ जानेवारीच्या मध्यरात्री १२ नंतर ही घटना घडली.
पोलिसांनी दिली माहिती
काल रात्री ११ च्या सुमारास मुंबईला लागून असलेल्या मीरा रोडच्या नया नगर भागात हिंदू समाजातील काही लोक ३-४ वाहनांमधून घोषणाबाजी करत होते. यानंतर त्यांचा इतर समाजातील काही लोकांशी वाद सुरू झाला. बिघडलेली परिस्थिती पाहून पोलिसांचे वाहन तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि काही लोकांना ताब्यात घेतले. परिस्थिती नियंत्रणात आली असून परिसरात फ्लॅग मार्च काढण्यात आला आहे. याप्रकरणी नयानगर पोलिसांनी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
-जयंत बजबळे, डीसीपी
चिघळलेली परिस्थिती पाहून मुंबई पोलिसांचे जवान वाहनांतून घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले. मीरा रोड पोलिसांनी फ्लॅग मार्च काढल्याचे पोलिसांनी सांगितले. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ज्या भागात ही घटना घडली तो मुस्लीमबहुल परिसर असल्याचे पोलिसांनी सांगितले. या परिसराला लागून असलेल्या भागात गुजराती, मारवाडी आणि जैन समाजाचे लोक मोठ्या संख्येने राहतात. या समाजातील लोकच सनातन यात्रा काढत होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.