मिर्झापूर: प्रेयसीला गर्भपाताचे औषध देण्यासाठी पहाटेच्या अंधारात बोलावले; तिने नकार देताच...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 08:22 PM2022-12-09T20:22:26+5:302022-12-09T20:22:47+5:30
मिर्झापूर जिल्ह्यातील जिग्ना पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. गंगा नदीच्या काठावर एका निर्जन ठिकाणी प्रियकर प्रेयसी भेटले होते.
मिर्झापूर : उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. प्रेयसी गर्भवती राहिल्यावर पायाखालची जमीन घसरलेल्या प्रियकराने तिचा गळा चिरला आहे. पोलिसांनी आरोपीला १२ तासांत अटक केली आहे.
प्रेयसीने प्रियकराला फोन करून ती प्रेग्नंट असल्याचे सांगितले. यावर तरुणाने तिला गर्भपाताचे औषध आणून दिले. तेव्हा प्रेयसीने त्याला ते औषध घेण्यास नकार दिला. तसेच लग्न करण्याचा तगादा लावला. यामुळे त्या तरुणाने प्रेयसीचा ब्लेडने गळा चिरला आणि हत्या केल्याचा प्रकार घडला आहे.
मिर्झापूर जिल्ह्यातील जिग्ना पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडली आहे. गंगा नदीच्या काठावर एका निर्जन ठिकाणी प्रियकर प्रेयसी भेटले होते. कविता निषाद (वय 19) ही तरुणी बुधवारी पहाटेपासून घरातून बेपत्ता झाली होती. शोधाशोध करूनही ती सापडली नाही. गंगेच्या काठावर तरुणीचा मृतदेह सापडल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी त्याच गावच्या शिवकुमार निषाद या तरुणाला अटक केली आहे.
प्रियकराने प्रेयसीला पहाटेच्या अंधारात गंगाकाठावर बोलविले होते. तिथे तिला त्याने गर्भपाताचे औषध दिले. मात्र तिने ते घेण्यास नकार दिला. यामुळे त्याने आधी तिचा गळा दाबला आणि नंतर तिचा गळा चिरला. यापूर्वी या तरुणाला तरुणीच्या नातेवाईकांनी घरात रंगेहाथ पकडले होते.