अरे गोळ्या कशाला झाडताय? डॉक्टर गयावया करत होते; हल्लेखोरांनी ८ गोळ्या झाडल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 07:26 PM2022-03-12T19:26:25+5:302022-03-12T19:37:09+5:30
भररस्त्यात दोघांचा डॉक्टरांवर हल्ला; गोळ्या झाडून दोन हल्लेखोर पसार
मेरठ: उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एका प्राध्यापकावर जीवघेणा हल्ला झाला आहे. पशुवैद्यकीय डॉक्टरवर मोदीपुरम येथे जीवघेणा हल्ला झाला. हल्लेखोरांनी डॉ. राजबीर सिंह यांच्या कारला ओव्हरटेक करून त्यांना रोखलं. हल्लेखोरांना पाहून डॉक्टरांनी हात जोडले. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी सिंह यांच्यावर हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती सध्या नाजूक आहे.
दुचाकीवरून आलेल्या दोघांनी हेल्मेट घातलं होतं. त्यातल्या एकानं कारच्या समोरून, तर दुसऱ्यानं ड्रायव्हिंग सीटच्या बाजूनं सिंह यांच्यावर गोळ्या झाडल्या. जवळपास ४ मिनिटांत हा सगळा प्रकार घडला. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. एका विद्यार्थ्यानं ही घटना पाहिली. त्यानं याची माहिती पोलिसांना दिली.
घटना घडण्याआधी डॉ. सिंह त्यांच्या विभागातील डॉ. अमित कुमार यांच्यासोबत बोलत होते. सिंह त्यांची कार कमी वेगानं चालवत होते. तितक्यात डॉ. अमित यांनी गोळ्या झाडल्या जात असल्याचा आणि काच फुटल्याचा आवाज ऐकला. अरे गोळ्या का झाडताय, असं सिंह म्हणत होते. डॉ. अमित यांनी फोनवर हे सगळं ऐकलं.
काही राऊंड फायर झाल्यानंतर डॉ. सिंह यांच्या रडण्याचा आवाज अमित यांनी ऐकला. आपला जीव वाचवण्यासाठी ते दयायाचना करत होते. त्यानंतर फोन बंद झाला. त्यानंतर अमित खाली आले. त्यांना डॉ. सिंह यांची कार दिसली नाही. डॉ. अमित घटनास्थळी पोहोचले तेव्हा डॉ. सिंह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांचा फोन तुटलेल्या स्थितीत होता.
हल्लेखोर गोळ्या झाडत असताना सिंह मदतीसाठी गयावया करत होते. त्यांनी आसपासच्या लोकांची मदत मागितली. मात्र हल्लेखोरांकडे बंदूक असल्यानं कोणीच पुढे आलं नाही. सध्या पोलीस आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. डॉ. सिंह यांना आठ गोळ्या लागल्या. घटनास्थळी पोलिसांना काडतुसं आढळून आली आहेत. फॉरेन्सिक टीमनं घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे.